Sai Sudharsan Broke Chris Gayle Record: साई सुदर्शनने आरसीबीविरूद्ध सामन्यात खेळताना यंदाच्या आयपीएलमधील पहिलं शतक झळकावलं आहे. या शतकी खेळीदरम्यान त्याने ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडत पहिलं स्थान आपल्या नावे केलं. आयपीएल २०२६ चा ३४ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय मात्र गुजरातच्या पथ्यावर पडला.

प्रथम फलंदाजी करताना, गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शनने उत्कृष्ट कामगिरी केली आणि आपल्या २ हजार आयपीएल धावा पूर्ण केल्या. यासोबतच, त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडत, आयपीएलमध्ये डावांच्या बाबतीत सर्वात जलद २ हजार धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू बनण्याचा मान मिळवला. इतकंच नाही तर, या सामन्यात त्याने ५७ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं, जे त्याचं तिसरं आयपीएल शतक ठरलं.

साई सुदर्शनने ४७ डावांमध्ये २ हजार आयपीएल धावा पूर्ण केल्या. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता, ज्याने ४८ डावांमध्ये हा पराक्रम केला होता. ५२ डावांमध्ये हा टप्पा गाठून शॉन मार्श या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सीएसकेचा ऋतुराज गायकवाड ५७ डावांमध्ये २ हजार आयपीएल धावा करून चौथ्या क्रमांकावर आहे. केएल राहुलने ६० डावांमध्ये हा टप्पा गाठला असून तो या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

आयपीएलमध्ये डावांच्या आधारे सर्वात जलद २ हजार धावा करणारे खेळाडू

साई सुदर्शन – ४७ डाव
ख्रिस गेल – ४८ डाव
शॉन मार्श – ५२ डाव
ऋतुराज गायकवाड – ५७ डाव
केएल राहुल – ६० डाव

साई सुदर्शनने आयपीएलमध्ये १३६१ चेंडूंमध्ये आपल्या २ हजार धावा पूर्ण केल्या. चेंडूंनुसार २ हजार धावा करणारा तो सहावा सर्वात वेगवान भारतीय खेळाडू आहे. या बाबतीत अभिषेक शर्मा यादीत अव्वल स्थानी आहे. अभिषेकने ११९३ चेंडूंमध्ये २ हजार धावा पूर्ण केल्या. त्यानंतर अभिषेक शर्मा आहे. त्याने हा पराक्रम १२११ चेंडूंमध्ये केला. ऋषभ पंत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १३०६ चेंडूंमध्ये आयपीएलमधील २ हजा धावा पूर्ण केल्या.

आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत जलद २ हजार धावा करणारे भारतीय खेळाडू

११९३ चेंडू – अभिषेक शर्मा
१२११ चेंडू – वीरेंद्र सेहवाग
१३०६ चेंडू – ऋषभ पंत
१३२६ चेंडू – यशस्वी जैस्वाल
१३५३ चेंडू – युसूफ पठाण
१३६१ चेंडू – साई सुदर्शन*