Sai Sudharsan IPL Record: गुजरात टायटन्सने आयपीएल २०२६ मध्ये प्लेऑफमधील आपले स्थान आधीच निश्चित केल्यानंतर आता संघाने चेन्नई सुपर किंग्सविरूद्धचा सामनाही ८७ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. या विजयासह संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. गुजरातच्या या विजयात फलंदाजीत साई सुदर्शनचा मोलाचा वाटा आहे. सलामीवीर साई सुदर्शनने ८४ धावांची खेळी करत एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, गुजरात टायटन्सने २० षटकांत २२९ धावा केल्या, ज्यात सलामीवीर साई सुदर्शनने महत्त्वाची भूमिका बजावली.
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ८४ धावांची खेळी करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सुदर्शनने अव्वल स्थानही पटकावलं. इतकंच नाही, तर सुदर्शनने असा पराक्रम केला आहे, जो आयपीएलमध्ये गेल्या सात वर्षांत केवळ एकदाच घडला होता. साई सुदर्शनने आपल्या खेळीत चार षटकार आणि सात चौकार मारत ८४ धावांची खेळी केली. संथ सुरूवात केल्यानंतर शुबमन गिल बाद होताच साईने आक्रमक फटकेबाजी केली व संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
गेल्या काही आयपीएल हंगामांत साई सुदर्शन आपल्या कमालीच्या फॉर्मात आहे, ज्यात चालू हंगामाचाही समावेश आहे. या हंगामात त्याने ६०० हून अधिक धावा केल्या असून तो ऑरेंज कॅपच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध केलेल्या अर्धशतकामुळे, सलग पाच डावांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा करणारा तो आयपीएलच्या इतिहासातील केवळ चौथा खेळाडू ठरला आहे. साई सुदर्शनच्या आधी आयपीएलमध्ये हा पराक्रम केवळ वीरेंद्र सेहवाग, जोस बटलर आणि डेव्हिड वॉर्नर यांनी केला होता, ज्यात आता साई सुदर्शनच्या नावाचाही समावेश झाला आहे. तर गेल्या ७ वर्षांमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.
आयपीएलमध्ये सलग पन्नासपेक्षा जास्त धावांची खेळी खेळणारे खेळाडू
वीरेंद्र सेहवाग – ५ (२०१२)
जोस बटलर – ५ (२०१८)
डेव्हिड वॉर्नर – ५ (२०१९)
साई सुदर्शन – ५ (२०२६)
चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात साई सुदर्शनच्या ८४ धावांच्या खेळीमुळे त्याने या स्पर्धेच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा ६०० धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएल २०२५ मध्येही सुदर्शनचा प्रभावी फलंदाजीचा फॉर्म दिसून आला, जिथे त्याने १५ डावांमध्ये ५४.२१ च्या सरासरीने ७५९ धावा केल्या, ज्यात सहा अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे.
साई सुदर्शनने कर्णधार शुभमन गिलसोबत संघाला वादळी सुरूवात करून देत पहिल्या विकेटसाठी १२५ धावा जोडल्या. सुदर्शन आणि गिल यांनी आयपीएलमध्ये दहाव्यांदा शतकी भागीदारी करून नवा विक्रम आपल्या नावे केला. त्यांच्या शतकी भागीदारीमुळे गुजरात टायटन्सला २२९ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. शुबमन गिलने ३७ चेंडूंमध्ये ६४ धावा केल्या. जोस बटलरने २७ चेंडूंमध्ये नाबाद ५७ धावा केल्या.
