Sai Sudhasran Surpassed Virat Kohli: गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शनने आयपीएल २०२६ मध्ये दमदार फॉर्मात आहे. साई सुदर्शनने खोऱ्याने धावा करत खुद्द विराट कोहलीचा विक्रम मोडत मोठा इतिहात घडवला. अहमदाबादमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. सनरायझर्सचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर साई सुदर्शनने पुन्हा एकदा संघासाठी महत्त्वाची खेळी साकारली. गेल्या सहा सामन्यांतील त्याचं हे पाचवं अर्धशतक ठरलं.
अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजीसाठी बिलकुल सोपी नव्हती, त्यामुळे सावधतेने आणि परिणामी आक्रमक फटके खेळणं महत्त्वाचं होतं. साई सुदर्शनने याचा योग्य संगम साधत संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. शुबमन गिल आणि जोस बटलर लवकर बाद झाल्यानंतर गुजरात टायटन्स अडचणीत सापडला होती. अशा परिस्थितीत २४ वर्षीय साई सुदर्शनने ४४ चेंडूत ६१ धावांची संयमी पण प्रभावी खेळी करत संघाला १६८ धावांपर्यंत पोहोचवलं. त्याच्या डावात ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
साई सुदर्शनची ऐतिहासिक कामगिरी
साई सुदर्शनने हैदराबादविरूद्ध सामन्यातील खेळीसह आयपीएल २०२६ हंगामात ५०० धावांचा टप्पा पार केला आणि अशी कामगिरी करणारा तो यंदाच्या मोसमातील पहिला फलंदाज ठरला. आयपीएल २०२५ मधील ऑरेंज कॅप विजेत्या सुदर्शनच्या नावावर आता १२ डावांत १५५.५९ च्या स्ट्राइक रेटने ५०१ धावांची नोंद आहे. यामध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
सामन्यादरम्यान काही काळ तो मोसमातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. मात्र, नंतर हेनरिक क्लासेन त्याच्यापुढे गेला. सुदर्शनच्या आयपीएल कारकिर्दीत तिसऱ्यांदा त्याने एका हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी केली आहे. याआधी त्याने २०२४ मध्ये ५२७ आणि २०२५ मध्ये ७५८ धावा केल्या होत्या.
विशेष म्हणजे, वयाच्या २४व्या वर्षी हंगामात तीन वेळा ५०० अधिक धावा करणारा साई सुदर्शन हा आयपीएल इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनी २५ वर्षांचे होण्यापूर्वी प्रत्येकी दोन वेळा अशी कामगिरी केली होती.
सर्वात कमी वयात ५०० अधिक धावा करणारे फलंदाज
साई सुदर्शन – ३ वेळा – २०२४, २०२५, २०२६
विराट कोहली – २ वेळा – २०११, २०१३
यशस्वी जैस्वाल – २ वेळा – २०२३, २०२५
शॉन मार्श – १ वेळा – २००८
सुरेश रैना – १ वेळा – २०१०
साई सुदर्शन हा आयपीएल इतिहासात तीन वेळा ५०० अधिक धावा करणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे. त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला असून विराटने २०१६ च्या हंगामात वयाच्या २६व्या वर्षी हा पराक्रम केला होता. राजस्थान रॉयल्सचा उपकर्णधार यशस्वी जैस्वाललाही हा विक्रम मोडण्याची संधी आहे. सध्या त्याच्या नावावर ११ सामन्यांत ३१५ धावा आहेत आणि सुरू असलेल्या मोसमात तो ५०० धावांचा टप्पा गाठू शकतो.
