दुखापतींच्या ससेमिऱ्यात अडकलेल्या भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झालेला भरवशाचा मधल्या फळीतील फलंदाज साई सुदर्शन दुखापतीमुळे मालिकेतच खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. क्रिकइन्फो वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार साई सुदर्शन पायाच्या बोटाला झालेल्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे दोन टेस्टच्या या मालिकेत तो खेळू शकणार नाही. बीसीसीआयने यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही.
साई सुदर्शनची संघात निवड झाली होती पण त्याचा सहभाग सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मंजुरीवर अवलंबून होता. साई सुदर्शन संघाबरोबर श्रीलंकेला रवाना झाला नव्हता. दुखापतीतून न सावरल्याने तो या मालिकेला मुकणार आहे. दरम्यान साई सुदर्शनऐवजी बदली खेळाडूची निवड तूर्तास तरी करण्यात आलेली नाही. देवदत्त पड्डीकलला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला मिळेल अशी चिन्हं आहेत. साई सुदर्शनने काही दिवसांपूर्वी आटोपललेल्या भारतीय अ संघाच्या श्रीलंका दौऱ्यात १३२, ७, १६८ आणि २५ अशी कामगिरी केली होती.
साई सुदर्शन खेळू न शकल्यास निवडसमिती सर्फराझ खानचा विचार करणार का हे पाहणं उत्सुकतेचं आहे. साई सुदर्शनप्रमाणेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही मालिकेत खेळू शकणार नाहीये. बुमराहच्या जागी रणजी करंडक स्पर्धेसह डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या आकीब नबीची संघात निवड करण्यात आली आहे.
पहिल्या कसोटीपूर्वी आयोजित सराव सामन्यात हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे कर्णधार शुबमन गिल खेळायला उतरला नाही. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाचं नेतृत्व करत आहे. भारतीय संघाला दुखापतींनी वेढा दिला आहे. हर्षित राणा, आकाश दीप, नितीश कुमार रेड्डी हे दुखापतीतून सावरत असल्यामुळे मालिकेत खेळू शकणार नाहीत. वॉशिंग्टन सुंदर बंगळुरूस्थित सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये असून, तो पहिल्या टेस्टमध्ये खेळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. रिहॅब प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मंजुरी मिळाली तर दुसऱ्या टेस्टसाठी त्याच्या नावाचा विचार होऊ शकतो.
१५ ऑगस्टपासून गॉल टेस्ट सुरू होत आहे. दुसरी टेस्ट २३ ऑगस्टपासून कोलंबो इथे होणार आहे. गुरनूर ब्रार, आकीब नबी, सारांश जैन यांच्यापैकी कुणाला अंतिम अकरात संधी मिळते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
