भारताच्या बी.साईप्रणीत, पी.सी.तुलसी व अरुधंती पानतावणे या उदयोन्मुख खेळाडूंनी सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविले. मात्र एच. एस. प्रणोय व अरविंद भट यांचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले.प्रणीत याने पात्रता फेरीच्या पहिल्या लढतीत मलेशियाचा माजी अखिल इंग्लंड विजेता महंमद हफीझ हाशिम याच्यावर २१-१३, २१-१५ अशी मात केली. पाठोपाठ त्याने राईची ताकेशिता याचा २१-१२, २२-२० असा पराभव केला. २० वर्षीय खेळाडू प्रणीत याला आता जागतिक क्रमवारीतील चौथा मानांकित युआन होयू याच्याशी खेळावे लागणार आहे. प्रणोय याला सिंगापूरच्या यांग झाओ चेन याने १९-२१, २१-१९, २१-१२ असे चुरशीच्या लढतीनंतर पराभूत केले. भट याला हाँगकाँगच्या नान वेई याने १९-२१, २१-९, २१-१५ असे हरविले.
महिलांच्या एकेरीत अरुंधती हिने पहिल्या लढतीत रशियाच्या अॅना अस्ट्राखांत्सेवा हिला २१-५, २१-१० असे सहज पराभूत केले तर दुसऱ्या लढतीत तिने स्थानिक खेळाडू झिआओयु लियांग हिच्यावर २१-१४, २१-१६ अशी मात केली. तिला पहिल्या फेरीत पेटया नेदेलचेवा हिच्याशी खेळावे लागणार आहे. तुलसी हिने थायलंडच्या चोचुवांग पोर्नवेई हिच्यावर १८-२१, २१-१३, २१-८ असा विजय मिळविला. पाठोपाठ तिने व्हिएतनामच्या थेई ट्रँग वु हिचा २१-१८, २१-१७ असा पराभव केला. तुलसी हिच्यापुढे लिंडावेनी फानेत्री हिचे आव्हान असेल.
महिलांच्या दुहेरीत भारताच्या ज्वाला गट्टा व प्राजक्ता सावंत यांचे आव्हान पात्रता फेरीतच संपले. मलेशियाच्या वेई हानतान व डेलिस युलियाना यांनी त्यांचा २२-२०, २१-१२ असा पराभव केला.
प्राजक्ता हिला मिश्रदुहेरीतही पराभवास सामोरे जावे लागले. प्राजक्ता व मलेशियाचा महंमद लतीफ यांना सिंगापूरच्या झांग येओ व लेई याओ यांच्यापुढे १६-२१, २०-२२ अशी हार पत्करावी लागली.
पुरुषांच्या दुहेरीत झेंग येई कोक व किटझेन कॉग या मलेशियन जोडीने भारताच्या मनीष गुप्ता व गौरव वेंकट यांना २१-१३, २१-९, २१-१५ असे पराभूत केले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jun 2013 रोजी प्रकाशित
सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा : साईप्रणीत, तुलसी, अरुंधती मुख्य फेरीत
भारताच्या बी.साईप्रणीत, पी.सी.तुलसी व अरुधंती पानतावणे या उदयोन्मुख खेळाडूंनी सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविले. मात्र एच. एस. प्रणोय व अरविंद भट यांचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले.प्रणीत याने पात्रता फेरीच्या पहिल्या लढतीत मलेशियाचा माजी अखिल इंग्लंड विजेता महंमद हफीझ हाशिम याच्यावर २१-१३, २१-१५ अशी मात केली.

First published on: 19-06-2013 at 01:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai thulasi arundhati qualify for main draw in singapore