भारताचा ऑलिम्पिकपटू पारुपल्ली कश्यप याला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीच्या पहिल्याच लढतीत पराभवाचा धक्का बसला असला तरी महिलांच्या एकेरीत भारताची स्टार खेळाडू सायना नेहवालने विजयी सलामी दिली. दुहेरीत प्रणव चोप्रा व अक्षय देवळकर यांनी आव्हान कायम राखले आहे.
अटीतटीने झालेल्या लढतीत कश्यपला जर्मनीच्या दितेर डोमेकने पराभूत केले. शेवटपर्यंत रंगतदार झालेला हा सामना डोमेक याने २६-२४, १३-२१, २१-१८ असा जिंकला. दोन्ही खेळाडूंनी स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा बहारदार खेळ केला. पहिला गेम गमावल्यानंतर कश्यपने सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवीत दुसरी गेम जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक गेम अतिशय चुरशीने खेळला गेली. दोन्ही खेळाडूंनी चिवट खेळ केला. मात्र डोमेकने प्लेसिंगचा कल्पकतेने उपयोग करीत हा गेम घेतला आणि सामनाही जिंकला.
महिलांच्या एकेरीत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायनाला रशियाच्या नतालिया पेर्मिनोवाविरुद्ध विजय मिळविताना फारशी अडचण आली नाही. तिने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा उपयोग करीत हा सामना २१-११, २१-९ असा जिंकला.
पुरुषांच्या दुहेरीत प्रणव व अक्षय यांनी हाँगकाँगच्या युंग लुंगचान व चुनहेई ली यांना २१-१९, १६-२१, २२-२० असे रोमहर्षक लढतीनंतर हरविले. त्यांनी शेवटच्या गेममध्ये ड्रॉपशॉट्सचा सुरेख खेळ केला. मिश्र दुहेरीत भारताच्या अरुण विष्णू व अपर्णा बालन यांना जर्मनीच्या मायकेल फुक्स व निर्गित मिचेल्स यांच्याकडून १४-२१, ११-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी, अरुण व अपर्णा यांनी ब्राझीलच्या ह्य़ुगो ऑर्थेसो व फॅबिआना सिल्वा यांचा २१-१२, २१-१४ असा पराभव केला होता. भारताच्या तरुण कोना व अश्विनी पोनप्पा यांना पराभवास सामोरे जावे लागले. डेन्मार्कच्या अ‍ॅण्डर्स ख्रिस्तियन्सन व ज्युली होऊमान यांनी त्यांच्यावर २१-१६, २७-२५ असा निसटता विजय मिळविला.