ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने स्पर्धात्मक खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे. २०१६ च्या रिओ ऑलिंपिकमध्ये झालेल्या गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे सायनाच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला. पण त्यानंतर तिने २०१७ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक आणि २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून उल्लेखनीय पुनरागमन केलं. पण गुडघ्याच्या सततच्या समस्या त्याच्या प्रगतीत अडथळा आणत राहिल्या. यानंतर आता तिने पोडकास्टमध्ये बोलताना निवृत्तीची घोषणा केली आहे.

सायना नेहवालने सांगितलं की, तिचं शरीर आता उच्च स्तरावर खेळण्यासाठी फिट राहिलेलं नाही. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती सायना २०२३ च्या सिंगापूर ओपनमध्ये शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळली होती.

“मी दोन वर्षांपूर्वी स्पर्धात्मक सामने खेळणं थांबवलं होतं. मला वाटलं की मी माझ्या स्वतःच्या अटींवर खेळायला सुरुवात केली आहे आणि माझ्या स्वतःच्या अटींवर निवृत्त होईन, म्हणून ते जाहीर करण्याची गरज नव्हती. जर तुम्ही आता खेळू शकत नसाल तर ते ठीक आहे,” सायनाने एका पॉडकास्टमध्ये म्हटलं.

बॅडमिंटनमध्ये जागतिक नंबर वन राहिलेली सायना हिने गुडघ्याच्या दुखापतीमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचं तिने सांगितलं. “माझं कार्टिलेज पूर्णपणे झिजलं आहे, मला संधिवात (आर्थरायटिस) झाला आहे. हे माझ्या पालकांना आणि प्रशिक्षकांना माहिती असणं गरजेचं होतं आणि मी त्यांना ते सांगितलं. आता कदाचित मी पुन्हा खेळू शकणार नाही,” असंही सायनाने स्पष्ट केलं.

सायनाने पुढे सांगितले की तिला औपचारिकपणे निवृत्तीची घोषणा करण्याची गरज वाटत नाही, कारण स्पर्धेतील तिच्या अनुपस्थितीमुळे सर्व काही स्पष्ट होईल असं तिला वाटतं. सायना म्हणाली, हळूहळू लोकांना कळेल की सायना खेळत नाहीये. निवृत्तीची घोषणा करणं मला इतकी मोठी गोष्ट वाटली नव्हती. आता माझा खेळ थांबवण्याची वेळ आली आहे, असं मला वाटलं. कारण मी जास्त जोर लावू शकत नव्हते, माझा गुडघा पूर्वीसारखा ताण सहन करू शकत नव्हता.

सायना पुढे म्हणाली, जगातील सर्वोत्तम खेळाडू होण्यासाठी, तुम्हाला दिवसातून आठ ते नऊ तास सराव करावा लागतो. आता माझा गुडघा एक-दोन तासांतच हार मानत होता. गुडघ्याला सुज येत होती आणि त्यामुळे पुढे सराव करणं खूप कठीण जात होतं. त्यामुळे मी शेवटी विचार केला की, आता बस्स झालं मी यापुढे जाऊ शकत नाहीये.”

सायना नेहवालची बॅडमिंटन कारकीर्द

सायनाने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही दोन पदकं जिंकली आहेत. २०१५ मध्ये रौप्यपदक आणि २०१७मध्ये कांस्यपदक पटकावलं होतं. २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने महिलांच्या एकेरीत कांस्यपदक पटकावलं. मात्र २०१६ नंतर सातत्याने होत राहिलेल्या दुखापतींमुळे सायनाच्या कारकिर्दीवर परिणाम झाला.

त्यानंतरही सायनाने २०१७ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक आणि २०१८ मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकत दमदार पुनरागमन केलं. पण गुडघ्यांच्या वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे तिच्या कामगिरीत अडथळे येत राहिले. २०२४ मध्ये सायनाने खुलासा केला की, तिला गुडघ्यांत संधिवात (आर्थरायटिस) झाला असून, तिचं कार्टिलेज झिजून गेलं आहे. त्यामुळे अव्वल पातळीवरील स्पर्धेसाठी लागणाऱ्या तीव्रतेनं सराव करणं तिच्यासाठी अत्यंत कठीण झालं आहे.