‘कौटुंबिक सोहळे यात ती सहभागी होत नाही. नातेवाईकांच्या गोतावळ्यात रमली असती तर क्रीडापटू म्हणून घडू शकली नसती. खरेदीला जाणे, चित्रपट पाहणे, गप्पाटप्पा, भटकंती या सगळ्यासाठी तिच्याकडे वेळच नाही. तरुण मुले-मुली जे करतात, त्यापासून ती खूप दूर आहे. बॅडमिंटन हेच तिचे आयुष्य झालेय. तिच्या रूपात आम्हाला नवी ओळख मिळाली आणि आमचेही आयुष्य बदलले,’ अशा कृतज्ञ शब्दांत हरवीरसिंग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘मी नैसर्गिकदृष्टय़ा प्रतिभावान खेळाडू नाही. मर्यादित गुणवत्तेला अथक मेहनतीची जोड देणे माझ्या हातात आहे. प्रशिक्षक मला सूचना देतात त्यानुसार मी खेळते, कमीत कमी चुका करते आणि यश मिळते. यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो पण त्याला पर्याय नाही,’ असे सायना आम्हाला सांगत असते. कारकीर्दीत यशोशिखरावर असतानादेखील तिला याची जाणीव आहे. आम्ही केलेले संस्कार तिच्या अंगी रुजले आहेत याचे समाधान वाटते,’ असे हरवीरसिंग यांनी सांगितले.
हरवीरसिंग आठवणींना उजाळा देताना म्हणाले, ‘हरयाणातून हैदराबादला स्थलांतर केले ते दिवस आजही आठवतात. कृषीशास्त्रज्ञ म्हणून माझे काम सुरू होते. नवा प्रदेश, नवी संस्कृती, नवी भाषा या सगळ्यांशी सायनाने चटकन जुळवून घेतले. सुरुवातीला मोहम्मद आरिफसर आणि त्यानंतर गोपीचंद अकादमी हे संक्रमण सायनाने दमदार प्रदर्शनाच्या बळावर केले. आज सायना ब्रॅण्ड झाली आहे. तिच्या यशाच्या बळावरच कॉलनीतल्या साध्या घरातून आलिशान बंगल्यापर्यंतचा प्रवास झाला आहे.’
दुहेरी भूमिकेत
- ‘पालक म्हणून आमच्यावर दुहेरी भूमिका आहे. खेळाशी संलग्न तिला जे आवश्यक आहे ते पुरवणे आणि त्याच वेळी स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून तिला बहरू देणे.
- प्रशिक्षकाच्या कामात हस्तक्षेप करणे, पैशाच्या बळावर निवडीसाठी प्रयत्न करणे अशी ढवळाढवळ नको. खेळाडूकडे नैपुण्य असेल तर ते लपून राहणार नाही,’ असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
- ‘ऑलिम्पिकची तयारी सुरू झाली आहे. मात्र सारखे पदकाचे टुमणे लावण्यात अर्थ नाही. क्षमतेच्या शंभर टक्के प्रदर्शन होणे महत्त्वाचे आहे असे,’ सांगत हरवीरसिंग यांना पदकचर्चेला पूर्णविराम दिला.
प्रशिक्षकाच्या कामात हस्तक्षेप करणे, पैशाच्या बळावर निवडीसाठी प्रयत्न करणे अशी ढवळाढवळ नको. खेळाडूकडे नैपुण्य असेल तर ते लपून राहणार नाही.
– हरवीरसिंह
