सलामीच्या लढतीत मुंबई रॉकेट्स आणि अवध वॉरियर्स आज आमने-सामने

नाव, नियम आणि संघ अशा तिन्ही आघाडय़ांवर नवा साज लेवून प्रीमिअर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) पहिल्यावहिल्या हंगामाचा नारळ शनिवारी मुंबईत फुटणार आहे.  लिलाव, फ्रँचाइजी घोषणा, प्रशिक्षकांची नियुक्ती, प्रक्षेपण हक्क हे सगळे सोपस्कार घाईघाईत उरकून ही लीग देशभरातल्या बॅडमिंटनप्रेमींसाठी सज्ज झाली आहे. शनिवारी वरळीतील एनएससीआयच्या सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियममध्ये भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालच्या नेतृत्वाखालील अवध वॉरियर्स आणि मुंबई रॉकेट्स यांच्यात मुकाबला रंगणार आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर जगातील सर्वोत्तम बॅडमिंटनपटूच्या पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या सायनाचा खेळ पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.

अखिल भारतीय बॅडमिंटन असोसिएशन आणि स्पोर्टी सोल्यूशन्स यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजित इंडियन बॅडिमटन लीग दोन वर्षांपूर्वी झाली होती. मात्र आर्थिक समीकरणे विस्कटल्याने सलग दोन वर्षे लीगचे आयोजन होऊ शकले नाही. स्पोर्टी सोल्यूशन्सविरुद्ध ‘एल्गार’ करत भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने आयोजनाचे शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय घेतला आहे. कायदेशीर वादात अडकू नये, यासाठी लीगचे नाव ‘प्रीमिअर बॅडमिंटन लीग’ असे करण्यात आले.

इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सायनाने हैदराबाद हॉटशॉट्सचे प्रतिनिधित्व केले होते. सायनाच्या दिमाखदार खेळाच्या जोरावर हैदराबाद संघाने जेतेपदावर नाव कोरले होते. नव्या स्वरूपात लखनौने सायनाला आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहे. पुरुष एकेरीत बी. साईप्रणीत आणि सौरभ वर्मा हे भारतीय खेळाडू अवध संघाकडे आहेत. थायलंडचा तोंगसाक सेइनबुनसूक अवधसाठी महत्त्वपूर्ण आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूला मारहाण केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने बोडिनवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ही बंदीची शिक्षा पूर्ण केलेला बोडिन दमदार पुनरागमनासाठी उत्सुक आहे. दुसरीकडे मुंबईची भिस्त एच. एस. प्रणॉय आणि आरएमव्ही गुरुसाईदत्त या युवा भारतीय खेळाडूंवर आहे. त्यांच्या साथीला मॅथिअस बो आणि व्लादिमीर इव्हानोव्ह ही दुहेरीची अनुभवी जोडी आहे. यंदाच्या वर्षांत झंझावाती फॉर्ममध्ये असणारा मनू अत्री मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. गोपीचंद अकादमीची विद्यार्थिनी रुथविका शिवानीला खेळण्याची संधी मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

संघ

अवध वॉरियर्स : सायना नेहवाल, बी. साईप्रणीत, सौरभ वर्मा, तोंगसाक सेइनबुनसूक, जी. वृषाली, केई युन, हेंद्रा गुनावन, बोडीन इसारा, के. मनीषा आणि ख्रिस्तिना पेडरसन.

मुंबई रॉकेट्स : एच. एस. प्रणॉय, आरएमव्ही गुरुसाईदत्त, हान ली, लियू झि डेई, रुथविका शिवानी, मॅथिअस बो, व्लादिमीर इव्हानोव्ह, मनू अत्री, चायुत त्रियाचार्ट, कमिला जुहल.

हुकमी लढत

सामना सुरू होण्यापूर्वी दीड तास प्रत्येक संघाला हुकमी लढत ठरवणे अनिवार्य आहे.

हुकमी लढत जिंकल्यास आणखी दोन गुण मिळतील व हरल्यास एक गुण वजा होईल.

दोन्ही संघ एकच लढत हुकमी लढत म्हणून शिफारस करू शकतात.

सामन्याचे स्वरूप

महिला एकेरी (१)

पुरुष दुहेरी (२)

मिश्र दुहेरी (१)

पुरुष एकेरी (१).

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३ व एचडी वाहिन्यांवर तसेच हॉटस्टार.

वेळ : संध्याकाळी ६ वाजल्यापासून.