शालेय जीवनात मी पुण्यात राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी आले होते, त्या वेळी मिळविलेल्या यशामुळेच माझ्या बॅडमिंटन कारकीर्दीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यामुळेच या शहराचा माझ्या ऑलिम्पिक कांस्यपदकात महत्त्वाचा वाटा आहे. हे शहर मला नेहमीच आवडते, असे भारताची अव्वल दर्जाची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने शुक्रवारी सांगितले.अविनाश भोसले इंडस्ट्रिज फाऊंडेशनतर्फे सायना हिला पुण्यात आलिशान सदनिका बक्षीस म्हणून देण्यात आली. त्यावेळी सायना म्हणाली, ‘‘ऑलिम्पिक पदक मिळविण्याचे माझे स्वप्न बीजिंगमध्ये हुकले. लंडनमध्ये हे अपयश धुवून काढण्याचे माझे ध्येय होते आणि हे ध्येय साकार करण्यासाठी मी गेली चार वर्षे दररोज आठ ते नऊ तास मेहनत करीत होते. ही मेहनत फळास आली. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.’’
पदक मिळविण्यासाठी तू कोणता त्याग केला, असे विचारले असता सायना म्हणाली, ‘‘बारावी इयत्तेपर्यंत मी शिक्षणालाही महत्त्व दिले होते, मात्र जेव्हा मला या खेळातच चांगले यश मिळविण्याची खात्री झाली तेव्हा मी शिक्षण अर्धवट सोडले तसेच अन्य बऱ्याच आवडीनिवडी दूर ठेवल्या. सुदैवाने मला पालकांनी संपूर्ण सहकार्य दिले. त्यामुळेच मी पदकाचे यश पाहू शकले. ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न प्रत्येक खेळाडूने पाहिले पाहिजे आणि त्यासाठी कठोर मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे. फास्टफूड टाळले पाहिजे आणि थोडेसे शिस्तबद्ध जीवन जगले पाहिजे.’’
मध्यंतरी प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्याशी तुझे मतभेद झाले होते, त्याविषयी विचारले असता सायना म्हणाली, ‘‘काही महिने आमच्यात तात्त्विक मतभेद निर्माण झाले होते. मात्र चार पावले मागे घेत मी पुन्हा त्यांच्याकडे सरावासाठी गेले. ते खूप महान खेळाडू व प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझी कारकीर्द सफल झाली आहे. माझे सुरुवातीचे प्रशिक्षक एस. एम. अरीफ यांनी या खेळाचे दिलेले बाळकडू मला खूपच उपयुक्त ठरले आहे. ऑल इंग्लंड किंवा जागतिक स्पर्धेतील विजेतेपदापेक्षा ऑलिम्पिक पदकालाच मी प्राधान्य देते.’’