वर्षांतील पहिल्यावहिल्या  जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या सायना नेहवालने डेन्मार्क सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र युवा खेळाडू पी. व्ही. सिंधूला सलामीच्या लढतीतच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यप आणि गुरुसाईदत्तने विजयी आगेकूच केली.
गतविजेत्या सायनाने बल्गेरियाच्या स्टेफनी स्टोइव्हावर २१-१६, २१-१२ असा विजय मिळवला. सायनाने स्मॅशच्या फटक्यांचा खुबीने उपयोग केला. नेटजवळूनही तिने सुरेख खेळ केला. पहिल्या गेममध्ये सायनाने ३-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी तिने ११-६ अशी वाढवली. या आघाडीच्या आधारे आगेकूच करत सायनाने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही सायनाने ५-१ अशी आघाडी मिळवली. यानंतर सातत्याने ही आघाडी वाढवत सायनाने दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.
विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या सिंधूचे आव्हान अनपेक्षितपणे सलामीच्या फेरीतच संपुष्टात आले.जपानच्या इरिको हिरोसेने सिंधूवर २१-१९, २२-२० असा विजय मिळवला.
जागतिक क्रमवारीत अव्वल तीनमध्ये असलेल्या आणि अव्वल मानांकित चीनच्या ली झेरूईने अरुंधती पानतावणेचे आव्हान २१-१७, २१-१५ असे संपुष्टात आणले.
पुरुषांमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडू डॅरेन लिऊने दुखापतीमुळे माघार घेतल्याने कश्यपला विजयी घोषित करण्यात आले. मुंबईकर अजय जयरामने आठव्या मानांकित थायलंडच्या बुनसूक पोनसन्नाचा २१-११, २१-१४ असा धुव्वा उडवला. आरएमव्ही गुरुसाईदत्तने हाँगकाँगच्या युन ह्य़ुवर २१-१७, २१-१४ अशी मात केली.