भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी नव्या मोसमाची सुरुवात शानदार विजयाने केली. मलेशिया सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेतील आपापले सामने जिंकत सायना आणि सिंधूने दुसरी फेरी गाठली आहे.
आठव्या मानांकित सायनाने इंडोनेशियाच्या हेरा देसी हिचा केवळ ३६ मिनिटांत पराभव केला. गेल्या मोसमात एकही जेतेपद पटकावता न आलेल्या सायनाने हा सामना २१-१०, २१-१६ असा सहज जिंकला. सिंधूला मात्र पहिल्या फेरीत विजयासाठी कडवा प्रतिकार सहन करावा लागला. सिंधूने इंडोनेशियाच्या लिंडावेनी फानेट्री हिच्यावर ४३ मिनिटे रंगलेल्या सलामीच्या लढतीत २१-१७, २१-१८ अशी मात केली. सायनाला पुढील फेरीत चीनच्या याओ झुई तर सिंधूला सहाव्या मानांकित कोरियाच्या येओन जू बे हिचा सामना करावा लागेल.
सायनाने हेराविरुद्धच्या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत ४२ गुणांची कमाई केली. पहिल्या गेममध्ये २-० अशी सुरुवात करत सायनाने २१-१० अशी सरशी साधली. दुसऱ्या गेममध्ये हेरा हिने सायनाला कडवी लढत दिली. ६-६ अशा बरोबरीनंतर सायनाने सलग चार गुणांची कमाई केली. हीच आघाडी कायम राखत सायनाने दुसऱ्या गेमसह सामन्यात बाजी मारली.
सिंधूला मात्र विजयासाठी झगडावे लागले. १५-१५ अशा बरोबरीनंतर सिंधूने तीन गुण मिळवले. त्यामुळेच तिला पहिला गेम जिंकता आला. फानेट्रीने दुसऱ्या गेममध्ये ९-५ अशी आघाडी घेतली. पण सिंधूने आपला अनुभव पणाला लावत ९-९ अशी बरोबरी साधली. १६-१६ अशा बरोबरीनंतर मात्र लागोपाठ पाच गुण मिळवत सिंधूने दुसऱ्या फेरीत आगेकूच केली.
पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यप आणि के. श्रीकांतने विजयी आगेकूच केली असली तरी आरएमव्ही गुरुसाईदत्त आणि आनंद पवार यांचे आव्हान संपुष्टात आले. आनंद पवारला चीनच्या झेंगमिंग वँग याच्याकडून १२-२१, ११-२१ असे पराभूत व्हावे लागले. गुरुसाईदत्तने मात्र विजयासाठी प्रयत्न केले. पण त्याची झुंज नेदरलॅण्ड्सच्या इरिक पँग याने १८-२१, २१-११, २१-२३ अशी मोडून काढली. जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानी असलेल्या कश्यपने जर्मनीच्या मार्क वेबलर याचा २१-१९, २१-१३ असा पराभव केला.  श्रीकांतने हाँगकाँगच्या यून हू याच्यावर २१-१७, १८-२१, २१-१६ असा विजय साकारला. कश्यपला दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या ओ जॉर्गेन्सेन याच्याशी लढत द्यावी लागेल. श्रीकांतचा सामना दक्षिण कोरियाच्या सोन व्ॉन हो याच्याशी होईल.