गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे तीन महिने कोर्टपासून दूर असलेली भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवाल चायना सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यासाठी आतुर आहे.

गुडघ्याच्या दुखापतीमुळे रिओ ऑलिम्पिकमध्ये सायनाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागलेल्या सायनाच्या उजव्या गुडघ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सक्तीच्या विश्रांतीमुळे सायनाला तीन महिने खेळता आले नाही. बंगळुरूत प्रशिक्षक विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केल्यानंतर सायना आता पुनरागमनासाठी तयार झाली आहे. दोन वर्षांपूर्वी सायनाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. गेल्या वर्षी सायनाला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

सलामीच्या लढतीत सायनासमोर थायलंडच्या पॉर्नटिप बुरानप्रार्स्टुसकचे आव्हान आहे. पॉर्नटिपविरुद्धच्या नऊ लढतीत सायनाने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. मात्र पॉर्नटिपला कमी लेखून गाफील राहण्याची चूक सायना करणार नाही. यंदाच्या हंगामात पॉर्नटिप सातत्यपूर्ण कामगिरी करते आहे. सायनाने पुनरागमनाचा निर्णय घेतला आहे. मात्र ती शंभर टक्के तंदुरुस्त नाही, असे प्रशिक्षक विमल कुमार यांनी सांगितले.

ऑलिम्पिक पदकानंतर तब्बल दोन महिने सिंधू सत्कार समारंभांमध्ये व्यस्त होती. पुनरागमनानंतर सिंधूला दोन स्पर्धामध्ये झटपट गाशा गुंडाळावा लागला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन पदके नावावर असणाऱ्या सिंधूला अद्यापही एकदाही सुपरसीरिज स्पर्धेच्या जेतेपदाची कमाई करता आलेली नाही. या स्पर्धेद्वारे सिंधूची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. सिंधूची सलामीची लढत तैपेईच्या चिआ सिन ली हिच्याशी होणार आहे.

‘‘मी कसून सराव केला आहे. मी वेळापत्रक पाहिलेले नाही. प्रत्येक खेळाडू तुल्यबळ आहे,’’ असे सिंधूने सांगितले.

पुरुष गटात अजय जयरामचा मुकाबला चीनच्या झ्यू सियानशी होणार आहे. एच. एस. प्रणॉयची लढत हाँगकाँगच्या एन्ज का लाँगशी होणार आहे. बी. साईप्रणीत आणि जर्मनीचा मार्क झ्वालबरशी होणार आहे.