सर्वोत्तम महिला बॅडमिंटनपटूच्या पुरस्कारासाठी सायनाला नामांकन

तामिळनाडूतील पूरग्रस्तांसाठी सायनाचे दोन लाख

सायना नेहवाल

जागतिक बॅडमिंटन महासंघाकडून (बीडब्ल्यूएफ) दिल्या जाणाऱ्या वर्षांतील सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्कारासाठी भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला नामांकन देण्यात आले आहे.

सध्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सायनाने या वर्षी काही काळ अव्वल स्थान आपल्याकडे राखले होते. सध्या अव्वल स्थानावर असलेली स्पेनची कॅरोलिन मारिन, चीनची झाओ युनलेई आणि बाओ यिशिन या अन्य तीन स्पर्धकसुद्धा सायनाच्या शर्यतीत आहेत.
दुबईत होणाऱ्या जागतिक सुपर सीरिज फायनल्सच्या पाश्र्वभूमीवर अल बादिया गोल्फ क्लबवर ७ डिसेंबरला सायंकाळी एका खास कार्यक्रमात हे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर होणार आहेत.
सायनाने या वर्षी जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान प्राप्त करणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडूचा मान पटकावला होता. याचप्रमाणे तिने सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. दिल्लीतील बीडब्ल्यूएफ जागतिक सुपर सीरिज टूर स्पर्धा जिंकणाऱ्या सायनाने जागतिक अजिंक्यपद, ऑल इंग्लंड आणि थायहॉट चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धामध्ये उपविजेतेपद पटकावले आहे.
मारिनने यंदा ऑल इंग्लंड आणि नोव्हेंबरमध्ये हाँगकाँग खुली स्पर्धा जिंकली. याशिवाय तीन सुपर सीरिज स्पर्धा जिंकल्या. याशिवाय जागतिक अजिंक्यपद स्पध्रेचे विजेतेपद आपल्याकडे राखले.
हैदराबाद : तामिळनाडूत मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नागरिकांसाठी सायना नेहवालने दोन लाख रुपयांची मदत केली. तिचे वडील हरविर सिंग यांनी ही माहिती दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Saina nominated as best female badminton award