जयराम, श्रीकांत आणि ज्वाला-अश्विनी पराभूत

गतविजेत्या आणि अग्रमानांकित सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू या भारतीय खेळाडूंनी चीन खुल्या सुपरसीरिज बॅडमिंटन स्पध्रेत विजयी सलामी दिली. मात्र भारताच्या अजय जयराम, किदम्बी श्रीकांत, एच.एस. प्रणॉय यांच्यासह ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा यांना पराभवाचा धक्का बसला.
सायनाला चिनी खेळाडू सून युईविरुद्ध खेळताना विजयासाठी संघर्ष करावा लागला. सायनाने ४९ मिनिटांच्या या लढतीत २२-२०, २१-१८ असा विजय मिळवला. त्या तुलनेत सिंधूला रशियाच्या सेनिना पोजिकापरेवा हिच्यावर २१-१४, २१-९ अशी मात करताना फारशी अडचण आली नाही. विजेतेपदाची दावेदार असलेल्या सायनाला सूनने शेवटपर्यंत चिवट लढत दिली. ४९ मिनिटे चाललेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी स्मॅशिंगचा कल्पकतेने खेळ केला. तसेच नेटजवळून प्लेसिंगचाही उपयोग केला. दोन्ही गेम्समधील निर्णायक गुण मिळविताना सायनाला अनुभवाचा खूप फायदा झाला. सामना संपल्यानंतर सायना म्हणाली, ‘‘सूनने खूपच सुरेख खेळ केला. त्यामुळे मला प्रत्येक गुण मिळविताना संघर्ष करावा लागला. सुरुवातीला मला परतीच्या फटक्यांवर नियंत्रण घेता आले नाही.’’
सिंधूने सेनिनाविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीपासून बहारदार खेळ केला. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला सेनिनाने चांगली लढत दिली. मात्र सिंधूने हळूहळू आघाडी वाढवत सामन्यावर नियंत्रण मिळवले. पहिला गेम घेतल्यानंतर तिचा आत्मविश्वास आणखी वाढला. दुसऱ्या गेममध्ये तिने सेनिनाला फारशी संधी दिली नाही. पुरुष एकेरीत जयरामला पहिल्याच फेरीत अग्रमानांकित चेन लाँगने २१-१२, २१-११ असे, श्रीकांतला हाँगकाँगच्या हु युआनने २१-१२, २१-१८ असे सरळ दोन गेम्समध्ये पराभूत केले. प्रणॉयला चीनच्या गुओ काईने २१-१४, १७-२१, २१-१९ असे हरवले. चुरशीच्या लढतीत प्रणोयने दुसरा गेम घेत सामन्यात रंगत निर्माण केली होती. तिसऱ्या गेममध्येही त्याने चांगला खेळ करीत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्याचे प्रयत्न अपुरे ठरले.
जपानच्या नाओको फुकुमॅन-कुरुमी योनाओ जोडीने ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीवर २१-१६, २१-११ असा विजय मिळवला.