India vs Afghanistan India New Spin Coach: आयपीएल २०२६ नंतर आता टीम इंडियाची जर्सी घालून भारताचे खेळाडू मैदानावर उतरणार आहेत. येत्या ६ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्धचा कसोटी सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघांमध्ये एकमात्र कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी, बीसीसीआयने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारताच्या कोचिंग स्टाफमध्ये नव्या कोचची एन्ट्री झाली आहे.
अफगाणिस्तानविरूद्ध कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल करण्यात आला आहे. भारताचे माजी फिरकीपटू साईराज बहुतुले यांची टीम इंडियाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ते नवी चंदीगड येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यापासून ही नवीन जबाबदारी स्वीकारतील. ५३ वर्षीय बहुतुले हे भारतीय फिरकीपटूंना व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये देखील जवळून मार्गदर्शन करतील.
यापूर्वी, साईराज बहुतुले आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्स संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळ आणि बंगाल संघांसोबतही काम केलं आहे. बहुतुले २०१८ ते २०२१ पर्यंत राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षण स्टाफचा भाग होते, त्यानंतर ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये सामील झाले. जेव्हा राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते, तेव्हा बहुतुले यांनी इंडिया ‘अ’ आणि काही आंतरराष्ट्रीय मालिकांदरम्यान सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केलं. यानंतर, ते आयपीएल २०२५ मध्ये एका वर्षासाठी पुन्हा राजस्थान रॉयल्स संघात सामील झाले.
साईराज बहुतुले यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
बहुतुले यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली होती. त्यांनी १९९७ मध्ये भारतासाठी पदार्पण केलं आणि २००३ मध्ये शेवटचा सामना खेळला. यादरम्यान ते केवळ १० आंतरराष्ट्रीय सामने (दोन कसोटी आणि आठ एकदिवसीय) खेळले. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमधील त्यांची कामगिरी खूपच प्रभावी होती. सुमारे २० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी १८८ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये ६३० बळी आणि १४३ लिस्ट ए सामन्यांमध्ये १९७ बळी घेतले.
भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये यापूर्वी फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक नव्हता. आता साईराज बहुतुले मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबत काम पाहतील. प्रशिक्षण स्टाफमध्ये सितांशु कोटक (फलंदाजी प्रशिक्षक), मॉर्न मॉर्केल (वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक), टी. दिलीप (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) आणि रायन टेन डेस्काटे (सहाय्यक प्रशिक्षक) यांचाही समावेश आहे. ६ जून रोजी भारतीय संघ या वर्षातील आपला पहिला कसोटी सामना खेळेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना न्यू चंदीगड येथे खेळवला जाईल.
