Salman Agha Run Out PAK vs BAN Video: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिका खेळवली जात आहे. ही वनडे मालिका बांगलादेशमध्ये खेळवली जात असून दुसरा सामना ढाकामध्ये होत आहे. या सामन्यात पाकिस्तानचा खेळाडू सलमान अली आघा विचित्र पद्धतीने धावबाद झाला. मेहदी हसन मिराजने ज्यापद्धतीने त्याला रनआऊट केलं त्यावर मोठा वाद पेटला आहे. रनआऊट पाहून सलमान आघादेखील मैदानावर चांगलाच संतापला होता. व्हीडिओमध्ये पाहूया नेमकं काय घडलं?
पाकिस्तान आणि बांगलादेशमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मेहदी हसन मिराजने सलमान अली आघाला धावबाद केल्याने यादरम्यान खेळभावना नसल्याची चर्चा देखील रंगली आहे. खेळभावनेबद्दलचा जुना वाद निर्माण करणारी ही घटना ३९ व्या षटकात घडली.
सलमान आघा कसा झाला वादग्रस्त पद्धतीने रनआऊट?
मेहदी हसन मिराज ३९व्या षटकात गोलंदाजीला आला, तेव्हा मोहम्मद रिझवानकडे स्ट्राईक होती, त्याने चेंडू गोलंदाजाच्या उजव्या दिशेला टोलवला आणि मिराजने पायाने तो चेंडू थांबवला. दरम्यान, नॉन स्ट्रायकरच्या टोकावर असलेला आघा त्याच्या क्रीजच्या बाहेर होता आणि मिराज व आघाची टक्कर झाली. त्यानंतर आघा चेंडू उचलण्यासाठी आणि गोलंदाजाला परत देण्यासाठी खाली वाकला, पण मिराजने आघाला अडवत स्वतःच चेंडू उचलत अंडरआर्म थ्रो केला आणि आघा क्रीजच्या बाहेर असतानाच बेल्स उडवल्या. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवताच सलमान आघाने रागात मैदानावर ग्लोव्हज व हेल्मेट काढून फेकलं.
सलमान आघा धावबादचा निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवण्यात आला आणि अखेर आघाला बाद देण्यात आलं. या निर्णयामुळे आघा स्पष्टपणे नाराज दिसला. त्याने मिराजशी मैदानावर हुज्जत घातली आणि नंतर नाराज अवस्थेत मैदान सोडलं. रागाच्या भरात पॅव्हेलियनकडे जाताना तो स्वतःशीच काहीतरी बोलत होता. मैदानाबाहेर जाताना त्याने सीमारेषेच्या आतूनच हेल्मेट आणि ग्लोव्हज सीमारेषेबाहेर फेकले आणि त्यानंतर मैदानाबाहेर पडला. सलमान आघाच्या रनआऊटचा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
तत्त्पूर्वी बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केलं. तीन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने १-० ने आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज नाहिद राणा याने ५/२४ अशी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत पाकिस्तानचा डाव अवघ्या ११४ धावांत गुंडाळला होता. त्या सामन्यात बांगलादेशने आठ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.
