Pakistan Captain Salman Ali Agha on IND vs PAK Handshake controversy: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना नेहमीच रोमांचक आणि भावनिक राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये अटीतटीचे सामने पाहायला मिळाले आहेत, तर काहीवेळेस वादाला देखील तोंड फुटलं आहे. पण आशिया चषक २०२५ स्पर्धेतील भारत-पाकिस्तानचे सामने कोणीच कधी विसरू शकणार नाही. या स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये अनेक वाद पाहायला मिळाले. सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे भारतीय संघाने पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन करण्यास दिलेला नकार. या हस्तांदोलन वादाबाबत पाकिस्तानच्या कर्णधाराने मोठा खुलासा केला आहे.

आशिया चषक २०२५ पासून भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू मैदानावर हस्तांदोलन करणं टाळत आहेत. आता, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने आशिया कप २०२५ दरम्यान झालेल्या हस्तांदोलन न करण्याच्या वादाबाबत एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे, ज्यामुळे हा वाद पुन्हा पेटला आहे.

पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने खुलासा केला की, सामन्यानंतर त्यांची टीम भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यासाठी त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये गेली, पण दरवाजा बंद आढळला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हस्तांदोलन न करण्याचं धोरण २०२५ च्या आशिया कप दरम्यान लागू करण्यात आलं होतं. आघाने एका पॉडकास्टमध्ये स्पष्ट केलं की, नाणेफेकीच्या अगदी आधी त्याला या निर्णयाबद्दल माहिती देण्यात आली होती.

सलमान अली आघा भारत-पाकिस्तान हँडशेक वादावर काय म्हणाले?

“मी टॉससाठी गेलो, पण त्याआधी प्रेस कॉन्फरन्स झाली होती, तेव्हा हस्तांदोलन केलं होतं, ट्रॉफी शूट त्यावेळेसही हस्तांदोलन केलं होतं. टॉसला जाताना मी अगदी नॉर्मल होतो. थोडं वेगळं काही होईल याची कल्पना होती, पण हस्तांदोलनच होणार नाही, असं मात्र मला वाटलं नव्हतं,” असं आघाने पोडकास्टमध्ये बोलताना सांगितलं.

“मी आमच्या मीडिया मॅनेजर नईम भाईसोबत टॉससाठी गेलो. “मॅच रेफरी मला त्यांचं नावही आठवत नाही, मला बाजूला घेऊन म्हणाले, ‘आपण हे अशा प्रकारे करणार आहोत, हस्तांदोलन होणार नाही.’ मी त्यांना सांगितलं, ‘ठीक आहे, हस्तांदोलन नसलं तरी हरकत नाही. मलाही त्याची फार अपेक्षा नव्हती.’ म्हणजे त्यांनी आधीच सांगितलं होतं की हस्तांदोलन होणार नाही,” असा घटनाक्रम आघाने पुढे सांगितला.

“यानंतर सामना संपला. आम्ही हरलो. सामना संपल्यावर आम्ही त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये गेलो, पण त्यांनी तरीही हस्तांदोलन केलं नाही,” असा मोठा खुलासा आघाने पुढे केला.

“मी अनेक वेळा सांगितलं आहे की हे योग्य नाही. कारण आपण देशाचं प्रतिनिधित्व करतो. मी पाकिस्तानसाठी खेळतो, लोक माझ्याकडे पाहतात, लहान मुलं आपल्याकडून शिकतात. उद्या एखाद्या क्लब सामन्यात असं घडलं, तर त्यामागे आपलंच उदाहरण असेल. आपण रोल मॉडेल असतो, त्यामुळे असं वागणं योग्य नाही,” असं सलमान अली आघाने भारताच्या हस्तांदोलन न करण्याच्या भूमिकेबाबत मत मांडलं.