पाकिस्तान क्रिकेटमध्ये अतरंगी गोष्टी घडत असतात. पाकिस्तानचा वनडे आणि टी२० कर्णधार सलमान अली अघा बाबतही असंच काहीसं झालं आहे.

पाकिस्तानचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यात तीन कसोटी सामने होणार होते. गेल्या काही महिन्यात सलमानची कसोटीतली कामगिरी सर्वसाधारण झाली होती. मात्र तरीही त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला. नियमित कर्णधार बाबर आझम दुखापतीमुळे पहिली कसोटी खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. सलमान अली अघाकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली.

संघात मोहम्मद रिझवान आणि शान मसूद हे माजी कर्णधार होते. मात्र त्यांच्याऐवजी सलमानच्या नावाला पसंती देण्यात आली. पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव झाला. सलमानला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

दुसऱ्या कसोटीसाठी बाबर फिट होऊन संघात परतला. पहिल्या कसोटीत संघाची धुरा असलेल्या सलमानला संघातून डच्चू देण्यात आला. जो खेळाडू ११ जणांचं नेतृत्व करण्यासाठी लायक समजला जातो तो पुढच्या कसोटीत संघातच नाही हे पाकिस्तान क्रिकेटमध्ये होऊ शकतं.

दुसऱ्या कसोटीतही पाकिस्तानची पदरी पराभवच पडला. पाकिस्तानने मालिका गमावली. या पराभवाचे तीव्र पडसाद उमटले. दुसऱ्या कसोटीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ७ खेळाडूंना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला. मालिका सुरू असतानाच असा निर्णय घेणं अनाकलनीय होतं पण पाकिस्तान क्रिकेटमध्ये अशा गोष्टी नवीन नाहीत.

मायदेशी पाठवण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये सलमानचा समावेश होता. पहिल्या कसोटीत कर्णधार, दुसऱ्या कसोटीत राखीव खेळाडू आणि तिसऱ्या कसोटीपूर्वी मायदेशी रवानगी असा सलमानचा प्रवास झाला.

‘बेसिक्सकडे परतण्यात काहीच वावगं नाही. काही वेळेला ते आवश्यक असतं. यापेक्षा अभिमानास्पद काही असू शकत नाही. खेळाशी प्रामाणिक राहणं आवश्यक’, असं सलमानने म्हटलं आहे. प्रेसिडेंट ट्रॉफी स्पर्धेत सलमानने किंग्समेन अकादमी संघाकडून खेळताना मारखोर आयटी सोल्यूशन्स संघाविरुद्ध खणखणीत त्रिशतकी खेळी साकारली. ४२ चौकार आणि ६ षटकारांसह सलमानने त्रिशतकाला गवसणी घातली. सलमानच्या त्रिशतकी खेळीच्या बळावर किंग्जमेन अकादमीने ५६५ धावांवर डाव घोषित केला.

सलमानने मोहम्मद सुलेमानसह २७४ धावांची भागीदारी केली. मोहम्मदने ११५ धावांची खेळी करत सलमानला चांगली साथ दिली. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मला धावा करता आल्या नाहीयेत. तिथे झालेल्या चुका मी या डावात टाळल्या. त्रिशतकासारखी मोठी खेळी सहजी होत नाहीत. मी धावांसाठी संघर्ष करत आहे. मी ही खेळी कुटुंबीयांना समर्पित करतो’, असं सलमानने म्हटलं आहे.