Salman Ali Agha On India vs Pakistan Match: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सर्वात हाय व्होल्टेज सामना रविवारी खेळवला जाणार आहे. श्रीलंकेतील कोलंबोत होणाऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही आमनेसामने येणार आहेत. याआधी दोन्ही संघ आशिया चषक २०२५ स्पर्धेत आमनेसामने आले होते. या स्पर्धेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला लोळवलं होतं. या स्पर्धेत हँडशेकचा मुद्दा तुफान चर्चेत राहिला होता. दरम्यान सामन्याच्या एक दिवसाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने हँडशेकबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारत – पाकिस्तान सामन्याच्या एक दिवसाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार सलमान अली आघाने हँडशेकबाबत वक्तव्य केलं आहे. या पत्रकार परिषदेत त्याने, भारतीय खेळाडूंसोबत हँडशेक करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे.

सलमान अली आघा म्हणाला, “क्रिकेटमध्ये खेळ भावना असायला हवी. माझं वैयक्तिक मत फार महत्वाचं नसेल. पण क्रिकेट नेहमी आधी जसे होते तसेच खेळायला हवे. पुढे काय करायचं हे त्यांनी ठरवावं.”

भारतीय संघातील स्टार फलंदाज अभिषेक शर्मा पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे त्याला नामिबियाविरुद्ध झालेल्या सामन्यात विश्रांती दिली गेली होती. पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यातही त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. महत्वाच्या सामन्यातून अभिषेक शर्मा बाहेर होणं हा भारतीय संघासाठी मोठा धक्का असू शकतो. त्याच्या जागी संजू सॅमसन डावाची सुरूवात करताना दिसेल.अभिषेक शर्माबाबत बोलताना सलमान खान अली आघा म्हणाला, “आम्हाला सर्वोत्तम खेळाडूंचा सामना करायचा आहे. मी आशा करतो की, अभिषेक शर्मा पूर्णपणे फिट असेल आणि उद्या होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसेल. आम्हाला मजबूत संघाविरुद्ध खेळायचं आहे.”

आयसीसी टी -२० वर्ल्डकप सुरू होण्याआधीच पाकिस्तानने भारतासोबत सामना खेळण्यास नकार दिला होता. पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. इतर सर्व संघांसोबत खेळणार पण भारतासोबत खेळणार नाही, अशी भूमिका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतली होती. पण शेवटी आयसीसीसमोर पाकिस्तानला झुकांव लागलं आहे. १५ फेब्रुवारीला भारत – पाकिस्तान सामना होणार आहे.