पाकिस्तान क्रिकेट संघ आणि अतरंगी गोष्टी यांचं जुनं नातं आहे. लॉर्डस कसोटीत पाकिस्तानचा नियमित कर्णधार बाबर आझमने पुनरागमन केलं. बाबर संघात आल्यामुळे आधीच्या कसोटीतील कर्णधार सलमान अली अघालाच संघाबाहेर करण्यात आलं.
पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. हेडिंग्ले कसोटीत नियमित कर्णधार बाबर आझम दुखापतग्रस्त असल्याने खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत सलमान अली अघाकडे सूत्रं सोपवण्यात आली. सलमान धावांसाठी संघर्ष करत आहे. गोलंदाजीतही त्याला चमक दाखवता आलेली नाही. अंतिम अकरात त्याचंच स्थान पक्कं नाही. मात्र हेडिंग्ले कसोटीत त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. सलमान वनडे आणि टी२० प्रकारात पाकिस्तानचं नेतृत्व करतो. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात सलमानची कसोटीतली कामगिरी सर्वसाधारण झाली होती.
संघात पक्का असलेल्या खेळाडूकडेच कर्णधारपद सोपवण्यात येतं. पाकिस्तान संघाबाबत काहीही होऊ शकतं. ज्या खेळाडूकडे संघाची धुरा देण्यात आली, तोच पाच दिवसात टाकाऊ झाला. हेडिंग्ले कसोटीत पाकिस्तानचा डावाने पराभव झाला होता. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर पाकिस्तानची दाणादाण उडाली होती. पाकिस्तान संघाची ओव्हरसाईज स्वेटर्सवरून यथेच्छ खिल्ली उडवण्यात आली.
हेडिंग्ले कसोटीनंतर कर्णधारपदाचा मुकूट पुन्हा बाबरकडे सोपवायला तय्यार असल्याचं सलमान म्हणाला होता. त्याचं म्हणणं संघव्यवस्थापनाने एक पाऊल पुढे जात खरं ठरवलं. सलमानला केवळ कर्णधारपदावरून नव्हे तर संघातूनही वगळण्यात आलं. विशेष म्हणजे पाकिस्तान संघात मोहम्मद रिझवान, शान मसूद हे माजी कर्णधार होते. तरीही सलमानकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. कसोटीत नेतृत्व करण्याची सलमानची ही पहिलीच वेळ होती.
३२वर्षीय सलमानने २८ कसोटी, ५३ एकदिवसीय आणि ५२ टी२० सामन्यात पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. विशेष म्हणजे बदली खेळाडू म्हणून स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना सलमानने दुसऱ्या स्लिपमध्ये जॉर्डन कॉक्सचा अफलातून झेल टिपला. खुर्रम शहझादच्या गोलंदाजीवर ऑफस्टंपबाहेरचा चेंडू खेळायचा मोह कॉक्सला आवरला नाही. चेंडू बॅटची कड घेऊन थर्डमॅनच्या दिशेने जात होता. सलमानने जोरदार सूर लगावत सुरेख झेल टिपला. कॉक्सने ७ चौकारांसह ५५ धावांची खेळी केली.
