टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताच्या मनासारखी सुरुवात झालेली नाही. टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. विशेष म्हणजे भारताने विजयासाठी दिलेलं १५२ धावांचं आव्हान पाकिस्ताननं १० गडी राखून पूर्ण केलं आहे. या विजयासह पाकिस्ताननं टी २० विश्वचषकात भारताविरूद्ध पहिल्या विजयाची नोंद केली आहे. पाकिस्तानच्या विजयानंतर दिल्लीसह काही भारतीय भागात फटाके फोड्यावरुन मोठा वाद निर्माण झालाय. या प्रकरणामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी आक्षेप घेतलाय. मात्र आता या प्रकरणावरुन टीका करणाऱ्या सेहवाग आणि गंभीरवर पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने संताप व्यक्त केलाय.

सेहवाग काय म्हणालेला?
“दिवाळीदरम्यान फटाक्यांवर बंदी आहेत. मात्र भारतातील काही भागांत पाकिस्तानच्या विजयानंतर फटाके फोडण्यात आले. हो… ते विजयाचा आनंद साजरा करत असतील! पण मग दिवाळीत फटाके उडवल्याने काय नुकसान होतं? असलं ढोंग कशाला? हे सगळं ज्ञान तेव्हाच (सणांच्या वेळेस) बरं आठवतं”, असं ट्वीट वीरेंद्र सेहवागने केलं आहे.

वीरेंद्र सेहवागने या ट्वीटपूर्वी पाकिस्तानला विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच पाकिस्तान चांगलं क्रिकेट खेळल्याचं ट्वीट केलं होतं.

गंभीरने काय म्हटलं होतं?
माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर यांनीही फटाक्यांवरून खडे बोल सुनावले आहेत. गौतम गंभीरने शेमफुल हॅशटॅगसह “पाकिस्तानच्या विजयावर फटाके फोडून आनंद साजरा करणारे भारतीय होऊ शकत नाही”, असं ट्वीट केलं आहे.

पाकिस्तानी खेळाडूकडून टीका…
आता यावरुन पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू समलान भटने त्याच्या युट्यूब चॅनेलवरील एका व्हिडीओमध्ये सेहवाग आणि गंभीरने जरा सभ्यतेने वागण्याची गरज असल्याचं म्हटलंय. “आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या क्रिकेटपटूंकडून असं वागण्याची अपेक्षा नाहीय. ते इतके वर्ष क्रिकेट खेळले आहेत ते एवढे लोकप्रिय खेळाडू आहेत. त्यांच्यासारख्या लोकांनी इतरांना समजवावे असं अपेक्षित असतं. तेच अशापद्धतीने प्रतिक्रिया देऊ लागले तर त्यांच्या आजूबाजूचे लोक ते बरोबर बोलतायत असं विचार करु लागतील,” असं सलमान म्हणाला आहे.

गंभीर आणि सेहवागने जबाबदार वक्तव्य करायला हवीत…
गंभीर आणि सेहवागला लाखो लोक फॉलो करतात त्यामुळे त्यांनी अधिक जबाबदारीने प्रतिक्रिया द्याव्यात असं मतही सलमानने व्यक्त केलंय. “त्यांच्यासारख्या क्रिकेटपटूंनी ते काय लिहितात याचा आधी विचार करायला हवा, कारण त्यांचे लाखो फॉलोअर्स आहे. लोक त्यांना ऐकत असतात. ते काय बोलतात, करतात याचा लोकांवर परिणाम होतो. सर्वोत्तम चर्चा करणारे आणि भाषणं देणारे, एकता आणि शांततेचा संदेश देणारे अशी त्यांची ओळख असायला हवी. त्यांच्या दर्जाला जुळून येत नाहीत त्या गोष्टींबद्दल त्यांनी बोलू नये,” असंही सलमान म्हणालाय.

भारतासाठी पाकिस्तानमध्ये वाजलेले फटके
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानमध्ये भारत जिंकला होता तेव्हा फटका वाजवले होते अशी आठवणही सलमानने सांगितली. “भारत २००४ साली पाकिस्तानमध्ये एकदिवसीय सामना खेळत होता त्यावेळेस शेवटच्या सामन्याच्या वेळी पीसीबीने फटाक्यांची सोय केलेली. मालिका दोन दोनच्या बरोबरीत होती. भारताने मालिका जिंकल्यानंतरही फटके वाजवण्यात आलेले. हे पीसीबीने योग्य केलेलं. याला स्पोर्ट्समनशीप म्हणतात,” असंही सलमान म्हणालाय.