Video : पॅड बांधून फिल्डिंग अन् टिपला भन्नाट झेल

टी १० लीग स्पर्धेत घडला विचित्र किस्सा

क्रिकेटचा खेळ अतिशय अनिश्चित असतो. क्रिकेटमध्ये मैदानावर कधी काय होईल हे सांगणे कठीण असते. कधी गोलंदाज शेवटच्या चेंडूवर गडी बाद करत सामना जिंकवतो, तर कधी फलंदाज तुफान फटकेबाजी करत सामन्याचा कल आपल्या बाजूने झुकवतो. असाच एक दमदार पराक्रम पाकिस्तानचा खेळाडू सलमान बट यांनी केला. कतार टू १० लीग स्पर्धेत फाल्कन हंटर्सकडून खेळताना त्याने अफलातून पराक्रम केला. सलमान बटने २७ चेंडूत धडाकेबाज ३९ धावा केल्या. मुख्य म्हणजे या सामन्यात शेवटच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता असताना सलमान बटने थेट षटकार लगावला आणि हिट स्टॉर्मर्स संघाविरूद्ध सामना जिंकवून दिला. या फटक्यावर एका खेळाडूने पॅड बांधून झेल पकडल्याची चांगलीच चर्चा आहे.

…म्हणून पत्नीसाठी नव्हे, तर ‘तिच्या’साठी रोहितने काढली दाढी

फाल्कन हंटर्सची धावसंख्या ४ बाद ९८ होती. ९.५ षटकात हंटर्सने ही धावसंख्या गाठली होती. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर फाल्कन हंटर्सना ५ धावांची आवश्यकता होती. सामन्यात शेवटच्या चेंडूवर चौकार मारल्यास सामना सुपर-ओव्हरमध्ये जाणे शक्य होते, तर षटकार लगावल्यास हंटर्स विजयी होणार होते. गोलंदाजाने नेमका बाऊन्सर चेंडू टाकला. सलमान बटने चेंडूची दिशा पटकन ओळखली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारला. त्याने लगावलेल्या षटकाराने हंटर्सने सामना जिंकला, पण त्यापेक्षा अधिक चर्चा त्या चेंडूचा सीमारेषेबाहेर झेल घेणाऱ्याची रंगली. फाल्कन हंटर्स संघाचा खेळाडू पॅड बांधून खेळायला येण्यासाठी तयार होता. सलमान बटने लगावलेला षटकार सीमारेषेबाहेर गेला. तो चेंडू हवेत असतानाच त्या पॅड बांधलेल्या खेळाडूने उडी मारून झेल टिपला. समालोचकानेही त्या खेळाडूने टिपलेल्या झेलाचे कौतुक केले.

बटने सप्टेंबर २००३ साली पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने चांगली कामगिरी केली, पण २०१० नंतर त्याने अद्याप पाककडून क्रिकेट खेळलेले नाही. ऑगस्ट २०१० मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर सलमान बट शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर मात्र मॅच-फिक्सिंगच्या आरोपामुळे त्याला क्रिकेटपासून दूर रहावे लागले. त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. २०१५ साली ICC ने त्याच्यावरील बंदी उठवली. तेव्हापासून सलमान बट स्थानिक क्रिकेट आणि टी २०, टी १० लीग स्पर्धांमध्ये खेळतो आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Salman butt last ball six player catches ball with pads super catch video vjb