Longest Bowling Run Up World Record Sam Boduano: क्रिकेटमध्ये गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी काही पावलं धावत येतो आणि मग चेंडू रिलीज करतो, हे आपण नेहमीच पाहतो. मात्र, चक्क १०० किलोमीटर धावत येऊन चेंडू टाकण्याचा विक्रम कुणी केला तर? ऐकूनच आश्चर्य वाटेल. इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेटपटू सॅम बोडुआनोने अशीच अविश्वसनीय कामगिरी करत विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

क्रिकेटच्या इतिहासात शोएब अख्तर, ब्रेट ली आणि मायकल होल्डिंग यांसारखे लांब ‘रन-अप’ असलेले वेगवान गोलंदाज आपण पाहिले आहेत. मात्र, एका इंग्लिश क्लब क्रिकेटपटूने रन-अपची मर्यादाच पार करत एक अनोखा विश्वविक्रम केला आहे. सॅम बोडुआनो हा लांब पल्ल्याचा धावपटू आणि क्लब क्रिकेटपटू असून इन्स्टाग्रामवर ‘IronBodz’ या नावाने ओळखला जातो. त्याने केवळ एक चेंडू टाकण्यासाठी तब्बल ६२ मैल (सुमारे १०० किलोमीटर) धावत येत इतिहास घडवला.

या अनोख्या विक्रमासाठी सॅम बोडुआनोने ‘क्रिकेटची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावरून रन-अप सुरू केला आणि रात्रभर धावत तो वोकिंगमधील ‘व्हॅली एंड क्रिकेट क्लब’मध्ये पोहोचला. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सॅमने शनिवारी संध्याकाळी हा प्रवास सुरू केला. या प्रवासादरम्यान त्याने पांढरी क्रिकेट जर्सी परिधान केली होती आणि तो सलग १४ तासांहून अधिक काळ धावत राहिला.

१० किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्यानंतर त्याने लंडन ब्रिजवरून एक ‘व्ह्लॉग’ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्याने प्रवासादरम्यानचा आपला अनुभवही टिपला आहे. सकाळी एका टप्प्यावर थकव्यामुळे तो एका विजेच्या खांबाला धडकला. या घटनेचाही समावेश त्याच्या व्हिडीओमध्ये आहे. यापूर्वी सर्वाधिक अंतराचा ‘रन-अप’ १४ मैल म्हणजेच सुमारे २४ किलोमीटर इतका होता. सॅमने तब्बल १०० किलोमीटर धावत हा विक्रम मोठ्या फरकाने मोडीत काढला.

विशेष म्हणजे, रविवार, ३० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता चेंडू टाकण्याचा कार्यक्रम नियोजित होता. त्याआधीच सॅम निश्चित ठिकाणी पोहोचला होता. १०० किलोमीटरचा रन-अप पूर्ण केल्यानंतर त्याने जेव्हा आपला पहिला चेंडू टाकला, तेव्हा त्याचे वडील फलंदाज म्हणून क्रीजवर होते. चेंडू टाकल्यानंतर लगेचच त्याने पंच आणि स्कोअरर्सच्या उपस्थितीत एक अधिकृत क्रिकेट सामनाही खेळला. फलंदाजी करताना त्याने काही उत्कृष्ट फटकेही लगावले.

सॅमची ही ऐतिहासिक कामगिरी केवळ विक्रम करण्यापुरती मर्यादित नव्हती, तर त्यामागे एक कौतुकास्पद हेतूही होता. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस यांची दिवंगत पत्नी रुथ स्ट्रॉस यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आलेल्या ‘रुथ स्ट्रॉस फाउंडेशन’साठी त्याने ३,२०० पौंडांहून अधिक निधी उभारला.

यापूर्वी क्रिकेटचे पॅड्स घालून आणि हातात बॅट घेऊन ५ किलोमीटरची ‘पार्करन’ (Parkrun) २० मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करण्याचा पराक्रमही सॅमने केला होता.