संदीप द्विवेदी
यंदाच्या हंगामात देशाच्या छोट्या शहरातल्या मैदानांमधलं बोलणं आयपीएलपर्यंत जाऊन पोहोचलं. विकसत होऊ पाहणाऱ्या त्या मिनी भारतातल्या मंडळींना त्यांच्या मातीत भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार घडल्याचं अनुभवायचं आहे. मालेगाव का सुपरमॅनच्या धर्तीवर आशा आणि प्रचंड महत्त्वाकांक्षा यांची ही गोष्ट आहे.
देशभरातल्या स्टेडियम्समध्ये आता समस्तीपूरचा लारा, गोपाळगंजचा रबाडा, मेरठचा सुरेश रैना अशा घोषणा कानी येतात. वंडरकिंड वैभव सूर्यवंशी, बिहारचाच वेगवान गोलंदाज साकीब हुसैन तसंच तडाखेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध समीर रिझवी यांनी आपापल्या गावांना-शहरांना जागतिक क्रिकेटच्या नकाशावर स्थान मिळवून दिलं आहे. मात्र नकाशावर हे स्थान पक्कं करण्यासाठी त्यांनी येत्या काही वर्षात अविरत मेहनत करावी लागणार आहे आणि खूप साऱ्या प्रलोभनांना बाजूला सारावं लागणार आहे.
आतापर्यंतची या सगळ्यांची वाटचाल परिकथेप्रमाणे आहे. १५व्या वर्षी वैभव सूर्यवंशी ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवरील निष्णात गोलंदाजांचा समाचार घेतो ते समस्तीपूरवासीयांना अभिमानास्पद आहे. फटके लगावताना त्याची हाय बॅकलिफ्ट म्हणजे फटका खेळताना शरीर संतुलित ठेवत उंच सरळ रेषेत बॅट जाणं. या बॅकलिफ्टने समस्तीपूरवासीयांना थेट ब्रायन लाराची आठवण होते. ही चर्चा एवढी झाली की खुद्द वैभवलाही ते पटलं. इंटरनेटवर ब्रायन लाराचे व्हीडिओ लूपवर पाहणं वैभवच्या दिनक्रमाचा भाग होऊन गेलं. आता तर तो लाराच्या व्हीडिओचं पारायणच करतो.
वैभव ज्यावेळी आयपीएल स्पर्धेतील राजस्थान रॉयल्सच्या ट्रायलसाठी गेला तिथे त्याला प्रशिक्षक झुबिन भरुचा भेटले. लाराला आदर्श मानतो या वैभवच्या उत्तराने ते चक्रावून गेले. ज्यावेळी त्यांनी वैभवचा खेळ पाहिला, त्याचे फटके पाहिले, हाय बॅकलिफ्ट पाहिली तेव्हा त्यांना वैभवचं उत्तर पटलं. आधी पटलं नव्हतं त्यालाही कारण होतं. वैभव त्यांना भेटला तेव्हा अवघा १३वर्षांचा होता. लाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला त्यानंतर वर्षभरानंतर वैभवचा जन्म झाला. त्यामुळे वैभवने लाराला असं टीव्हीवर खेळताना पाहिलं असण्याची शक्यताच नाही. जे काही पाहिलं असणार ते इंटरनेटच्या माध्यमातून. दूर कॅरेबियन बेटांवरच्या दिग्गजाच्या खेळाची मोहिनी बिहारमधल्या एका शाळकरी क्रिकेटपटूवर व्हावी!
या प्रश्नाचं खरंतर परिस्थितीचं गमक एका हिंदी चित्रपटातल्या गाण्यात आहे. छोटे छोटे शहरो से खाली भरो दोपहरो से- बंटी आणि बबली चित्रपटातल्या गाण्याचं हे शब्द. शहरं होऊ पाहणाऱ्या निमशहरांमध्ये, गावांमध्ये रटाळ टळटळीत उन्हाच्या दुपारी मोठी स्वप्नं पाहिली जातात. वैभवने समस्तीपूरमध्ये असताना अशाच एका दुपारी लाराचा व्हीडिओ युट्यूबवर पाहिला. बॅटने अद्भुत करामती करणारा तो अवलिया त्याच्या डोक्यात बसला. त्याच्याही नकळत लारा त्याच्या खेळात उतरला. म्हणूनच समस्तीपूरवासीयांना वैभवच्या खेळात लारा दिसतो. कारण तिथल्या जुन्याजाणत्या माणसांना लारा माहिती आहे. जी गोष्ट समस्तीपूरची तीच मेरठ आणि गोपाळगंजची.
येत्या काही वर्षांमध्ये उगवत्या लारा, रबाडा, रैना यांच्या वाटचालीकडे क्रिकेटरसिक बारकाईने लक्ष ठेवून असतील. जर ते अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत किंवा त्यांच्या आदर्शाला साजेसं खेळू शकले नाहीत तर केलेली तुलना एखाद्या चुकीच्या गुंतवणुकीप्रमाणे निकाली निघाली असं लोक म्हणतील. याची एक दुसरी बाजूही आहे. ही युवा मंडळी खरोखरंच चांगलं खेळतील. आपल्या आदर्श खेळाडूंच्या छायेतून- प्रतिमेतून बाहेर येतील आणि स्वतची गोष्ट रचतील.
भारतीय क्रिकेटमध्ये अशी उदाहरणं खच्चून भरली आहेत. पृथ्वी शॉ याला विरारचा सचिन तेंडुकर म्हटलं जायचं. मात्र आता त्याची वाट भरकटली आहे. मुंबईचा नेक्स्ट बिग थिंग दुर्देवाने मुंबईचा नेक्स्ट फ्लॉप ठरला आहे. नाडियाडच्या टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या मंडळींनी अक्षर पटेलला नाडियादचा जयसूर्या असं नाव दिलं. हा टॅग फार काळ टिकला नाही. आता तो अक्षर पटेल आहे. कारण त्याने मेहनतीच्या बळावर, कर्तृत्वाच्या बळावर हे नाव कमावलं आहे. वर्ल्डकपविजेत्या संघाचा अविभाज्य घटक आहे. देशातल्या अव्वल अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. एका आयपीएल संघाचा कर्णधार आहे. जवळचे त्याला हक्काने बापू म्हणतात. त्याने नाडियादला क्रिकेटच्या नकाशावर नेलं. चांगल्या बातमीच्या शोधात असलेली मंडळी जेव्हा अहमदाबादला क्रिकेट सामन्याच्या वार्तांकनाला जातात तेव्हा हटकून अक्षरच्या नाडियादला जातात. मात्र अजूनही ते पर्यटकांचं आकर्षण केंद्र झालेलं नाही.
खऱ्या अर्थाने मोठे झालेले खेळाडू यांनी त्यांच्या शहराचं नाव उज्वल केलं. त्यांच्या झळाळत्या कर्तृत्वामुळे शहरालाही एक नवी ओळख मिळाली. शहराच्या सामाजिक, आर्थिक प्रक्रियेला वेग दिला. वीरेंद्र सेहवागला नजफगढचा नवाब म्हटलं जातं. रोहित शर्माला मुंबईचा राजा म्हटलं जातं. सौरव गांगुली प्रिन्स ऑफ कोलकाता आहे. सेहवाग चमकला नसता तर नजफगढ हे आजही दिल्लीच्या वेशीवरचं अनेक टोळ्या आणि त्यांच्यातल्या हाणामाऱ्यांचा अड्डाच राहिलं असतं. गांगुलीने भरारी घेतली नसती तर कोलकाताला ती झळाळी मिळाली नसती. हे फक्त इथलं नाही. शोएब अख्तरने वेगाची धार दाखवली नसती तर रावळपिंडीला एक्स्प्रेस टॅग मिळाला नसता. लोकांनी गजबजलेला बाजार आणि निहारी यापुरतीच रावळपिंडीची ओळख मर्यादित राहिली असती. जेव्हा पाकिस्तानात क्रिकेट होत असे तेव्हा अनेक पत्रकार रावळपिंडीला जात असत. शोएब अख्तरच्या वेगाचा तडाखा बसलेल्या मंडळींची भेट घेत असत. ताशी दीडशे वेगाने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचा वेग कसा असतो ते त्यांच्याकडून ऐकण्यासाठी ते आतूर असत.
२००८ मध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना एका पत्रकाराने गॉलहून कोलंबोला जाताना वाट वाकडी केली आणि तो सनथ जयसूर्याच्या गावी जाऊन पोहोचला. सनथला माटारा मौलर म्हटलं जातं. माटारा या समुद्री गावी जयसूर्याचा जन्म झाला. पत्रकाराने त्या गावाचा दौरा केला तेव्हा जयसूर्या चाळिशीत आला होता. पण त्याच्या गावी तेव्हाही जयसूर्या हे प्रस्थ होतं. उत्साही रिक्षावाल्याने जयसूर्याच्या अनेक गोष्टी सांगून पत्रकाराला समृद्ध केलं. त्याने गाव दाखवलंच पण जयसूर्याची जडणघडण कशी झाली तेही नकळत समजावलं. सुव्हेनिअर शॉपमध्ये काम करणाऱ्या ताईंनी सुनामीनंतर हे गाव जयसूर्याचं गाव म्हणून कसं ओळखलं जाऊ लागलं ते सांगितलं.
सुनामीच्या प्रलयंकारी लाटेने त्यांच्या घराला तडाखा दिला. एका झाडाचा ढलपा त्यांच्या हाती लागला, त्याला धरून त्यांनी जीव वाचवला. प्रत्येकाची जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू होती. मदत सहज पोहोचणं शक्य नव्हतं. हे चित्र बदललं जेव्हा त्या म्हणाल्या- मी सनथ जयसूर्याची आई आहे. सनथने आपल्यालाठी एवढं काही केलं आहे, आपण त्याच्या आईसाठी एवढं नक्कीच करू शकतो.
माटारा हे गाव खेळातल्या दिग्गजाचं गाव. ते तीर्थक्षेत्रच होऊन गेलं. क्रिकेटचं दैवत अर्थात सचिन तेंडुलकरच्या मुंबईतल्या वांद्रे इथल्या घराबाहेर आजही क्रिकेटरसिक अनेक तास वाट प्रतीक्षा करतात. कोणत्याही क्षणी सचिन अवतरेल आणि आपल्याला त्याची छबी टिपता येईल. याचि देही याचि डोळा त्याला पाहता येईल असं चाहत्यांना वाटतं. तिथे प्रतीक्षा करून झाली की ही सगळी मंडळी शिवाजी पार्क इथे जातात. ज्या ठिकाणी सचिनने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली त्या खेळपट्ट्या बघतात. दूरवर ऑस्ट्रेलियातलं बोरल नावाचं गाव. सिडनी शहरातली माणसं उन्हाळ्यात सुट्टीसाठी या गावी जायची. आता हे गाव सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या स्मृतीस्थळासाठी प्रसिद्ध आहे. क्रिकेटचे रसिक या तीर्थक्षेत्राची पायधूळ झाडतात.
दिल्लीत, विशेषत: पश्चिम दिल्लीत विराट कोहलीचं घर हे आता आकर्षणाचा केंद्रबिंदू झालं आहे. विराट कोहली जिथे छोले भटुरे खायचा ते दुकानही प्रचंड लोकप्रिय झालं आहे. राहुल द्रविड बंगळुरूतल्या इंदिरानगरचा. मध्यंतरी एका जाहिरातीच्या निमित्ताने राहुल द्रविडचं कधीही न पाहिलेलं असं रागावलेलं रुप पाहायला मिळालं. इंदिरानगर का गुंडा असं त्याचं वर्णन करण्यात आलं होतं. याच भागात तो लहानाचा मोठा झाला. इथली मंडळी हा अवतार समजून घेतील म्हणूनच त्याने हे धारिष्ट्य केलं.
असं म्हणतात एखादं ठिकाण-शहर- भवताल माणसाला घडवतो. काही खास माणसं शहरालाच आपल्या कर्तृत्वाने उन्नत करतात.
