Pakistan Sameer Minhas Creates History: अंडर-१९ आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५० षटकांत ८ बाद ३४७ धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज समीर मिन्हास याने वादळी फलंदाजी करत १७१ धावांची खेळी केली. या दीडशतकी खेळीसह त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

अंडर-१९ आशिया चषकाच्या रोमांचक अंतिम सामन्यात, पाकिस्तानचा युवा सलामीवीर समीर मिन्हासने भारतीय गोलंदाजीविरूद्ध आक्रमक फलंदाजी केली. त्याने १५२.२१ च्या स्ट्राईक रेटने ११३ चेंडूत १७२ धावांची स्फोटक खेळी केली, ज्यामध्ये १७ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता.

यासह, पाकिस्तानच्या समीर मिन्हासने अंडर-१९ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम केला. यापूर्वी, अंडर-१९ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात कोणत्याही फलंदाजाने १५० धावांचा टप्पाही गाठला नव्हता. यंदाची ही स्पर्धा समीर मिन्हाससाठी संस्मरणीय होती. या स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी केली.

मिन्हासने पाच सामन्यांमध्ये १५७.०० च्या सरासरीने ४७१ धावा केल्या, ज्यात दोन शतकं आणि एक अर्धशतकाचा समावेश होता. त्याने ११७.४५ च्या स्ट्राईक रेटने ४१ चौकार आणि १९ षटकार मारले. यामुळे तो १९ वर्षांखालील आशिया चषकाच्या एकाच सीझनमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. यापूर्वी, पाकिस्तानी फलंदाज सामी अस्लमने २०१२ च्या १९ वर्षांखालील आशिया चषकात पाच सामन्यांमध्ये ४६१ धावा केल्या होत्या. पण समीर मिन्हासने त्याला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला.

अंडर-१९ आशिया चषकाच्या एका सीझनमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

समीर मिन्हास (पाकिस्तान) – ४७१ धावा – २०२५
सामी अस्लम (पाकिस्तान) -४६१ धावा – २०१२
सामी अस्लम (पाकिस्तान) – ३७९ धावा – २०१३-१४
अशीक्वर रहमान (बांगलादेश) – ३७८ धावा – २०२३-२४
उनमुक्त चंद (भारत) – ३७० धावा – २०१२

पाकिस्तानच्या संघाने समीर मिन्हासच्या १७० धावांच्या खेळीच्या बळावर ८ बाद ३४७ धावांचं मोठा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात दणक्यात सुरूवात केल्यानंतर १०० धावांच्या आत भारताचा निम्मा संघ तंबूत परतला.