नवी दिल्ली : समीर वर्माने पाठीच्या दुखापतीमुळे सोमवारी भारतीय बॅडिमटन संघटनेच्या (बीएआय) निवड चाचणी स्पर्धेतून माघार घेतली. किरण जॉर्ज आणि प्रियांशु राजावत यांनी पुरुष एकेरीत दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे.
महिला एकेरीत आकर्षी कश्यप आणि अष्मिता चालिहा यांनी पहिल्या ते चौथ्या स्थानासाठीच्या शर्यतीत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना पराभूत करत आघाडी घेतली. या राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेतून आगामी थॉमस व उबेर चषक (८ ते १५ मे), राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (२८ जुलै ते ८ ऑगस्ट) आणि आशियाई स्पर्धेसाठी (१० ते २५ सप्टेंबर) भारतीय संघाची निवड केली जाणार आहे.
पुरुषांमध्ये ओडिशा खुली स्पर्धेचा विजेता किरणने रवीला २१-९, २१-१५ असे पराभूत केले, तर प्रियांशुला समीरविरुद्ध पुढे चाल मिळाली. ‘बीएआय’ने यापूर्वीच लक्ष्य सेन आणि किदम्बी श्रीकांत यांना भारतीय संघात थेट प्रवेश दिला आहे.
महिला गटात आकर्षीने अदिती भटला २१-१५, २१-१३ असे पराभूत केले. अष्मिताने उन्नती हुडाला २१-१३, २१-१६ असे नमवले. उबेर चषक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तीन स्थानांसाठी चुरस आहे. महिला एकेरीत दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवणारी पी. व्ही. सिंधू ही जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असल्याने तिला थेट प्रवेश देण्यात आला आहे.