Srilanka Cricket Team: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. श्रीलंकेचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले गेले. पण श्रीलंकेला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. बलाढ्य संघांना पराभूत करून श्रीलंकेने सुपर ८ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं. पण सुपर ८ मध्ये झालेल्या पराभवामुळे श्रीलंकेला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवता आलेला नाही. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा संघ सुरुवातीला पिछाडीवर होता. पण शेवटी कर्णधार दासून शनाकाने दमदार अर्धशतकी खेळी केली आणि श्रीलंकेला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं. शेवटच्या २ चेंडूवर ६ धावांची गरज असताना श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर श्रीलंकेचा मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्याने मोठा निर्णय घेतला आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंकेचा मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या श्रीलंकेच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोडणार आहे. त्याने श्रीलंका क्रिकेट बोर्डला याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर त्याची श्रीलंकेचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. येत्या जून महिन्यात त्याचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे.

आपल्या देशात सामने होत असल्याने श्रीलंकेला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण श्रीलंकेचा संघ हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. आजवर कुठलाही संघ आपल्या मायदेशात खेळताना टी – २० वर्ल्डकप जिंकू शकलेला नाही. त्यामुळे श्रीलंकेकडे इतिहास रचण्याची संधी होती. श्रीलंकेने या स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. पण झिम्बाब्वेकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर सुपर ८ मध्ये श्रीलंकेचा संघ एकही सामना जिंकू शकलेला नाही. त्यामुळे हा सामना सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकलेला नाही.

पाकिस्तानचा अवघ्या ५ धावांनी विजय

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने दमदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर पाकिस्तानने २१२ धावांचा डोंगर उभारला. श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी २१३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून दासून शनाकाने दमदार अर्धशतकी खेळी केली. शेवटच्या षटकात २८ धावांची गरज असताना त्याने २२ धावा कुटल्या. पण श्रीलंकेला हा सामना अवघ्या ५ धावांनी गमवावा लागला.