83 Movie Chirag Patil Audition Sandeep Patil Role Story: १९८३चा विश्वचषक जिंकणं हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्णअध्याय मानला जातो आणि याच ऐतिहासिक विजयावर आधारित ’83’ हा चित्रपट तयार करण्यात आला होता. कबीर खान यांनी दिग्दर्शित या चित्रपटामुळे सर्वांनाच १९८३ त्या विजयाची आणि त्या सामन्यांचा पुन्हा आनंद घेता आला. चित्रपटात १९८३च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या भूमिका विविध कलाकारांनी साकारल्या होत्या. यामध्ये दिग्गज क्रिकेटर संदीप पाटील यांची भूमिका त्यांच्या मुलानेच साकारली होती, जाणून घेऊया यामागची कहाणी.
कबीर खान दिग्दर्शित ‘83’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. रणवीर सिंगने कपिल देव यांची भूमिका साकारत या ऐतिहासिक विजयाची कहाणी पडद्यावर उभी केली. चित्रपटात १९८३च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या भूमिका विविध कलाकारांनी साकारल्या होत्या. या चित्रपटातील एक खास गोष्ट म्हणजे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटीलनेच साकारली होती. चिराग पाटील हा स्वत: मराठी अभिनेता आहे. त्याला ’83’ चित्रपटातील ही भूमिका कशी मिळाली, याबाबत त्याने सांगितलं आहे.
संदीप पाटील यांच्या मुलाला कशी मिळाली होती ’83’ चित्रपटात भूमिका?
राजश्री मराठीला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चिराग पाटीलने ही भूमिका कशी मिळाली हे सांगताना तो म्हणाला, “जेव्हा मला कबीर सरांनी ऑडिशनसाठी बोलावलं होतं. बाबांच्या रोलसाठी ऑडिशन द्यायला मी काय तयारी करू, मी बाबांना आयुष्यभर बघितलेलं आहे. तरी पण मी त्यांच्या मुलाखती व इतर गोष्टी पाहून ऑडिशनला पोहोचलो आणि त्यांनी मला हातात बॅट दिली. मी म्हटलं हे कुठलं ऑडिशन आहे. तितक्यात एक जण म्हणाला, अरे सरांनी तुमचे चित्रपट वगैरे पाहिले आहेत, त्यामुळे अॅक्टिंगच टेन्शन नाही, क्रिकेटचं टेन्शन आहे. मी म्हटलं आयला मला पण हेच टेन्शन आहे.”
“संपूर्ण ऑडिशनमध्ये मला १ ओव्हर टाकली, पण एकही बॉल बॅटला लागला नाही. त्यानंतर ऑडिशन झाली मी घरी आलो, त्यानंतर बाबांनी मला विचारलं, कसं झालं. मी म्हणालो मला वाटत नाही मला घेतील आणि मी वरचा प्रसंग सांगितला. आम्हाला वाटलं की आता नाही घेणार एक महिनाभर गेला मध्ये,त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स नाही आला. तोपर्यंत आम्हाला वाटलं की दुसरं कोणालातरी घेतलं असेल. मग एकदिवशी मला कबीर सरांचा फोन आला की, तू जरा ये भेटायला. मग मी गेलो,” असं संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटीलने पुढे सांगितलं.
पुढे सांगताना चिराग म्हणाला, ‘त्यांनी लॅपटॉपवर बाबांचे क्लिपिंग्स आणि माझं ऑडिशन साईड बाय साईड कम्पाईल करून व्हिडिओ बनवून मला दाखवला आणि मी पण ते बघून शॉक झालो. कारण माझा स्टान्स, माझे हावभाव, बॅटिंग असेल किंवा चालणं असेल किंवा हातवारे करायचं असेल ती एकदम म्हणजे ८० टक्के बाबांशी मॅच होत होती. कबीर सर मला म्हणाले, मला बॉल बॅटला लागणं गरजेचं नाहीये कारण हा चित्रपट आहे, तू त्यांच्यासारखा दिसला पाहिजेस. सो तशी मला ती फिल्म मिळाली. लोकांना वाटतं मला क्रिकेट खेळता येतं, मला क्रिकेट नाही येत. मी अनेकांना सांगतो मी क्रिकेट नाही खेळत, मला ते विचारतात मग चित्रपटात कसं, मी म्हटलं मी अभिनेता चांगलाय, मी अॅक्टिंग चांगली करतो. म्हणून मी करू शकलो.”
