२०१३ पासून संदीप शर्माला पाहतोय. केसांची स्टाईल तशीच. चेहरा तशाच. दाढीही तशीच. वजनही तेवढंच. वेगही तेवढाच. रोहित शर्माला बाद करण्यातलं सातत्यही तेवढंच- राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातला सामना झाल्यानंतर या आशयाचं मीम व्हायरल झालं. मीममध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टी खऱ्या आहेत. सातत्याने दमदार कामगिरी नावावर असूनही संदीप शर्माची फारशी चर्चा होत नाही आणि दखलही घेत जात नाही.

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे आधुनिक क्रिकेटचे मानकरी. आयपीएल स्पर्धेतही दोघांचं योगदान अतुलनीय असं. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच जेतेपदं नावावर केली आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट पहिल्या तर रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विराटने दोनदा ऑरेंज कॅप पटकावली आहे. आयपीएलची लोकप्रियता उंचावण्यात या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. या दोघांना तंबूत धाडणं प्रतिस्पर्धी संघाला नेहमीच जड जातं मात्र एका गोलंदाजाने या दोघांनाही सातत्याने माघारी धाडलं आहे मात्र या गोलंदाजांची फारशी चर्चा होत नाही.

या गोलंदाजाचं नाव आहे संदीप शर्मा. संदीप या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळतो आहे. संदीपने आयपीएलमध्ये विराट कोहलीला ७ तर रोहित शर्माला ६ वेळा तंबूत परतावलं आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत संदीप १५० विकेट्ससह चौदाव्या स्थानी आहे.

फास्ट बॉलरची सर्वसाधारणपणे असती तशी उंची नाही. प्रतिस्पर्धी संघातील बॅट्समनला भीती बसेल अशी शरीरयष्टी नाही. बॅट्समनची भंबेरी उडेल असा वेग नाही. बॅट्समनची एकाग्रता भंग करण्यासाठी शेरेबाजी, शिवीगाळ, हावभाव, खाणाखुणा नाहीत. मात्र प्रतिस्पर्ध्यांचा सखोल अभ्यास, खेळपट्टीचा नूर ओळखून अचूक टप्प्यावरची स्विंग बॉलिंग, चौकार-षटकारांनी खचून न जाता सापळा रचून बॅट्समनला कोंडीत पकडणं यामध्ये संदीपची हुकूमत आहे.

टी२० प्रकार हा फलंदाजांना पोषक असा. बहुतांश नियम फलंदाजधार्जिणे आहेत. गोलंदाजांवर खूप मर्यादा आहेत. असं सगळं असतानाही फलंदाजांच्या आक्रमणाने विचलित होत नाही. त्याच्या डोक्यात आडाखे तयार असतात. मागच्या सामन्यात झालेल्या चुका तो टाळतो.

मूळचा पंजाबच्या असलेल्या संदीपने पंजाबमधल्या पतियाळा इथं शाळेत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. संदीप तेव्हा बॅट्समन होता. प्रशिक्षकांनी त्याला गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. २०१०मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या U19 वर्ल्डकप स्पर्धत संदीप भारतीय संघात होता. संदीपने ६ मॅचमध्ये ७ विकेट्स घेतल्या होत्या.

२०१२ मध्ये ऑस्ट्रेलियात आयोजित U19 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदावर नाव कोरलं. संदीपने त्या स्पर्धेत १२ विकेट्स घेतल्या होत्या. फायनलमध्ये संदीपने चार विकेट्स घेत यजमान ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं होतं. युवा वर्ल्डकप स्पर्धेतली कामगिरी लक्षात घेऊन आयपीएल स्पर्धेतील किंग्ज इलेव्हन पंजाबने संदीपला ताफ्यात समाविष्ट केलं.

११ मे २०१३ रोजी मोहाली इथं झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत संदीपने आयपीएल पदार्पण केलं. पर्दापणाच्या लढतीतच संदीपने तीन विकेट्स पटकावल्या. त्या हंगामात संदीपला अंतिम अकरात खेळण्याची संधी तीनदाच मिळाली मात्र त्याच्यातली गुणवत्ता प्रशिक्षकांनी हेरली.

म्हणूनच २०१४ हंगामात संदीपने किंग्ज इलेव्हनसाठी ११ मॅचेसमध्ये १९.६६ इकॉनॉमी रेटने १८ विकेट्स घेतल्या. त्या हंगामात पंजाबने प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. त्या वाटचालीत संदीपचा वाटा मोलाचा होता. २०१५ मध्येही चांगली कामगिरी कायम राखत संदीपने १३ विकेट्स घेतल्या.

राजस्थानला मधल्या षटकांमध्ये तसंच हाणामारीच्या षटकांमध्ये निष्णात गोलंदाज हवा होता. धावांना वेसण घालू शकेल आणि विकेट्सही पटकावेल अशा गोलंदाजाची आवश्यकता संदीपने पूर्ण केली. त्यामुळेच राजस्थानच्या अंतिम अकरात संदीपचं नाव पक्कं असतं. आयपीएल स्पर्धेचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे संदीप युवा गोलंदाजांना मार्गदर्शनही करतो.

भारतासाठी पदार्पण

२०१५ मध्ये भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यासाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. संदीपला त्यावेळी भारतीय संघात समाविष्ट करण्यात आलं होतं. १७ जुलै रोजी हरारे इथं झालेल्या ट्वेन्टी-20 सामन्यात संदीपने भारतासाठी पदार्पण केलं. संदीपच्या बरोबरीने मनीष पांडे, केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल यांनी भारतासाठी ट्वेन्टी-20 पदार्पण केलं. त्या मॅचमध्ये संदीपला विकेट मिळवता आली नाही. दोन दिवसांनंतर दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात संदीपने पहिली विकेट मिळवली. या दौऱ्यानंतर संदीपचा टीम इंडियासाठी विचार झालेला नाही. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पंजाबसाठी खेळताना ५५ सामन्यात १८६ विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए सामन्यातही त्याच्या नावावर ११४ विकेट्स आहेत.

पॉवरप्ले स्पेशालिस्ट

ट्वेन्टी-20 फॉरमॅटमध्ये पहिल्या सहा ओव्हर पॉवरप्लेच्या असतात. त्यावेळी ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर दोनच फिल्डर ठेवता येतात. या टप्प्यात बॉलिंग करणे अत्यंत आव्हानात्मक असतं. कारण टप्पा थोडा चुकला की कत्तल होणं साहजिक. बॅट्समनने मारलेला फटका रोखण्यासाठी पुरेशी माणसं बाऊंड्रीवर उभी करता येत नाहीत हाही मुद्दा असतो. त्यामुळे अनेक चांगले बॉलर पॉवरप्लेमध्ये मार खातात. काही बॉलर पॉवरप्लेमध्ये बॉलिंग करणं टाळतात. संदीप शर्मा याबाबतीत अपवाद आहे. आयपीएल स्पर्धेत पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तो बॉलर आहे. बॉल स्विंग करून बॅट्समनला बुचकळ्यात टाकणारा बॉलर अशी संदीपची ओळख आहे. हैदराबादकडून खेळताना संदीपने भात्यात नकलबॉलची भर घातली आहे. हा बॉल ओळखून खेळणं बॅट्समनला अवघड होतं.

मोठ्या बॅट्समनची शिकार

बॉलर किती विकेट घेतो याबरोबरीने तो कोणाला आऊट करतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं. टेलएंडर्सना आऊट करणं तुलनेने सोपं असतं. समोरच्या संघातील मुख्य बॅट्समनला आऊट करणं हे खरं आव्हान असतं. संदीप शर्माची खासियत इथेच आहे. विराट कोहली, ख्रिस गेल, रोहित शर्मा अशा मोठ्या प्लेयरला संदीप आऊट करतो. ख्रिस गेलला बॉलरचा कर्दनकाळ संबोधलं जातं. पण बॉल स्विंग होतो तेव्हा गेलला खेळताना अडचण होते. संदीप हे करण्यात माहीर आहे. बॅट्समनच्या डोळ्यासमोरून बॉल स्विंग होतो. काही बॅट्समन लवकर फटका खेळल्यामुळे तर काही बॅट्समन खूप उशीर केल्यामुळे संदीपच्या जाळ्यात अडकतात.

दुखापतींचं ग्रहण

२०१४मध्ये संदीपला स्ट्रेस फ्रॅक्चर झालं. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यातून सावरण्यासाठी त्याला वर्षभराचा वेळ लागला. या काळात त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्या. फास्ट बॉलरसाठी खांदा खूपच महत्त्वाचा असतो. खांद्यावरच शस्त्रक्रिया झाल्याने स्विंग बॉलर असणाऱ्या संदीपला अ‍ॅक्शनमध्ये काही बदल करावे लागले.

आयपीएल प्रवास

संदीप २०१३ ते २०१७ असे पाच हंगाम पंजाब किंग्ज संघाकडून खेळला. १० ते ८५ लाख असं त्याचं मानधन वाढत गेलं. यानंतर सनरायझर्स हैदराबादने त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. याकरता त्यांनी ३ कोटी रुपये मानधन दिलं. २०२२ लिलावात संदीप शर्मा अनसोल्ड गेला. पुढचे सगळे हंगाम संदीप राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. राजस्थानने संदीपसाठी ४ कोटी रुपये मोजले.