भारतीय हॉकी संघात पुन्हा स्थान मिळविण्यापूर्वी ड्रॅग-फ्लिकर संदीप सिंग याने आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे, असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांनी सांगितले.
हॉकी इंडिया लीगमध्ये सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरी करणारा व सर्वाधिक गोल नोंदविणारा संदीप सिंग याला जागतिक लीग तसेच चॅम्पियन्स चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविता आलेले नाही. या संदर्भात विचारले असता नॉब्स म्हणाले, ‘‘केवळ पेनल्टी कॉर्नरवरील यश संघात स्थान मिळविण्यासाठी उपयुक्त नाही. संदीप सिंगने बचावात्मक खेळात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. संघात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी त्याच्या शैलीत बदल घडविणे आवश्यक आहे हे केवळ माझ्या एकटय़ाचे मत नसून निवड समितीमधील प्रत्येक सदस्याने हेच मत व्यक्त केले आहे. त्याच्या जागी ज्या खेळाडूंना स्थान दिले आहे, त्यांची शैली संदीपपेक्षा जास्त चांगली आहे. संदीप हा जरी गोल करण्यात चतुरस्र असला तरी प्रतिस्पर्धी खेळाडूंनी केलेले गोल रोखण्यात तो कमी पडतो.’’
‘‘हॉकी लीगमध्ये ज्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान दिले आहे. संदीप याला संघात स्थान मिळविण्यासाठी अजूनही संधी आहे. आपल्या चुका ओळखून त्याने या चुका टाळण्यात यश मिळविले तर भारतीय संघात त्याला लगेचच संधी मिळेल,’’ असेही नॉब्स म्हणाले.
हॉकी लीगविषयी नॉब्स यांनी सांगितले की, ‘‘ही स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी खूपच फायदेशीर ठरली आहे. ही स्पर्धा अतिशय रंजक ठरली. भारतीय खेळाडूंना परदेशी खेळाडूंबरोबर खेळण्याची व त्यांच्याकडून बरेच काही शिकण्याची संधी मिळाली. मनदीपसिंग याच्यासारख्या उदयोन्मुख खेळाडूंनी या स्पर्धेत लक्षणीय कामगिरी करीत आपला ठसा उमटविला आहे. त्याने या स्पर्धेत दहा फिल्ड गोल केले आहेत यावरूनच त्याची शैली सिद्ध होते. त्याच्याबरोबरच मलक सिंग, अमित रोहिदास या युवा खेळाडूंची कामगिरीही कौतुकास्पद झाली आहे. त्यांना उज्ज्वल भवितव्य आहे.’’