श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज कुमार संगकाराच्या कारकिर्दीतील अकराव्या द्विशतकाच्या जोरावर श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत मजबूत स्थिती गाठली. या द्विशतकी खेळीदरम्यान संगकाराने कसोटी क्रिकेटमध्ये सगळ्यात कमी सामन्यांमध्ये १२,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रमही नोंदवला. कारकीर्दीतील अकरावे द्विशतक झळकावणारा संगकारा १२,००० धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकांच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमापासून संगकारा केवळ एक द्विशतक मागे आहे. न्यूझीलंडच्या २२१ धावांसमोर खेळताना संगकाराच्या द्विशतकी खेळीमुळे श्रीलंकेने ३५६ धावांची मजल मारली.
संगकाराने ३०६ चेंडूंत १८ चौकार आणि ३ षटकारांसह २०३ धावांची मॅरेथॉन खेळी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या बिनबाद २२ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडचा संघ ११३ धावांनी पिछाडीवर आहे.