क्रीडा क्षेत्रात महिलांच्या सबलीकरणाची गरज!

टेनिसपटू सानिया मिर्झाचे प्रतिपादन

टेनिसपटू सानिया मिर्झाचे प्रतिपादन

क्रीडाक्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिलांना आणण्यासाठी आपल्या देशात व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा हिने व्यक्त केले.

दुहेरी आणि मिश्र दुहेरीत ग्रँडस्लॅम जिंकणारी सानिया ही भारताची पहिली आणि एकमेव महिला टेनिसपटू आहे. ‘‘मेरी कोम, सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी भारतीय क्रीडाजगतात अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्याशिवाय दीपा कर्माकर, साक्षी मलिक यांच्यासह किमान दहा महिला अव्वल खेळाडूंची नावे घेता येतील. तरीही क्रीडाक्षेत्रात महिलांना अद्यापही भेदभावाची वागणूक मिळत आहे,’’ अशा शब्दांत सानियाने नाराजी व्यक्त केली. ‘फिक्की’ या महिला संघटनेच्या वतीने आयोजित वार्षिक सोहळ्यात सानिया बोलत होती.

‘‘महिला सबलीकरण किंवा समानता हे आपण बोलत असलो तरी अद्यापही आपण पुरुषी प्राबल्याच्या क्षेत्रातच वावरत आहोत. क्रीडाक्षेत्रातही महिला खेळाडूंना पुरुषांच्या बरोबरीच्या रकमेचे पुरस्कार मिळणे अत्यावश्यक असल्याचे मत मी अनेक वर्षांपासून मांडत आले आहे. अद्यापही महिलांना हे जगाला सांगण्याची आवश्यकता का भासत आहे, हाच प्रश्न आहे,’’ असे सानियाने नमूद केले. आई झाल्यामुळे आपण नि:स्वार्थ प्रेम करू शकतो, ही भावनाच मला अधिक चांगली व्यक्ती घडवण्यास कारणीभूत ठरली आहे, असेही सानियाने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sania mirza