मेलबर्न : भारताची तारांकित टेनिसपटू सानिया मिर्झाने २०२२ हे कारकीर्दीतील अखेरचे वर्ष असल्याची घोषणा बुधवारी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्च २०१९मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर ३५ वर्षीय सानियाने पुनरागमन केले. मात्र करोनाच्या साथीमुळे तिच्या वाटचालीवर परिणाम झाला. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत पहिल्याच फेरीत पराभवानंतर सानियाने निवृत्तीची घोषणा केली. महिला एकेरीतही सानियाने जागतिक क्रमवारीत २७व्या क्रमांकापर्यंत मुसंडी मारली होती. परंतु मनगटाच्या दुखापतीमुळे सानियाने एकेरीऐवजी दुहेरीकडे लक्ष केंद्रीत केले आणि तिला अनपेक्षित यश मिळाले.

‘‘मला वाटले आता खेळू नये, म्हणून निवृत्तीच्या निर्णयापर्यंत आलेले नाही. अनेक कारणे याला जबाबदार आहेत. मला दुखापतीतून सावरायलाही बराच वेळ लागत आहे. माझा मुलगा तीन वर्षांचा आहे. त्याला सोबत घेऊन स्पर्धेसाठीचा प्रवास करणे हा जोखमीचा आहे. जे मला अधिक महत्त्वाचे वाटते,’’ असे सानियाने सांगितले.

‘‘ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेमधील एकेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीमधील अनेक उत्तम आठवणी माझ्याकडे आहेत. ही वाटचाल अप्रतिम होती. जून किंवा जुलैपर्यंतच्या स्पर्धाविषयी मी कोणतीही आखणी केलेली नाही. शरीराची तंदुरुस्ती, करोनाचे आव्हान यामुळे आयुष्यातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर मी पुढील आठवडय़ाविषयीच धोरण आखत आहे,’’ असे सानिया म्हणाली.

‘‘ऑस्ट्रेलियन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने हा निर्णय घेतलेला नाही. परंतु शरीराची साथ महत्त्वाची असते. हा हंगामसुद्धा पूर्ण करू शकेन याची शाश्वती नाही. परंतु जागतिक क्रमवारीत ५० ते ६० या क्रमांकांमध्ये स्थान असल्याने पूर्ण हंगाम खेळण्याबाबत आशावादी आहे,’’ असे सानिया म्हणाली.

सानिया मिर्झाचा प्रोफेशनल टेनिसला अलविदा! सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत जाहीर केला निर्णय

रोहन, सानिया  दुहेरीतून गारद

मेलबर्न : पहिल्या फेरीतील सामने गमावल्यामुळे भारताचे अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा यांचे अनुक्रमे पुरुष आणि महिला दुहेरीमधील आव्हान बुधवारी संपुष्टात आले आहे. रोहन आणि त्याचा फ्रेंच साथीदार ईडॉर्ड रॉजर-व्हॅसेलिन जोडीने ख्रिस्तोफर रुंगकॅट आणि ट्रीट हुई यांच्याकडून ६-३, ६-७ (२), २-६ अशा फरकाने पराभव पत्करला. ही लढत एक तास आणि ४८ मिनिटे चालली. स्लोव्हेनियाच्या टॅमारा झिदासेक आणि काजा जुव्हान जोडीने एक तास आणि ३७ मिनिटे रंगलेल्या लढतीनंतर सानिया आणि नाडिया किशेनॉक (युक्रेन) जोडीला ६-४, ७-६ (५) असे नमवले. आता मिश्र दुहेरीत रोहन आणि सानिया या भारतीयांचे आव्हान शाबूत आहे. रोहन क्रोएशियाच्या डॅरिजा जुरॅक शायबरच्या साथीने, तर सानिया अमेरिकेच्या राजीव रामसोबत खेळणार आहे. एकेरीत चारपैकी एकही टेनिसपटू पात्रतेचा अडथळा ओलांडून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही.

Australian Open 2023 : ग्रँडस्लॅमसह निवृत्तीचं सानिया मिर्झाचं स्वप्न भंगलं; मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पराभव!

दुहेरीत सहा ग्रँडस्लॅम जेतेपदे

सानियाने दुहेरीत सहा ग्रँडस्लॅम विजेतेपदे पटकावली असून, यात तीन मिश्र दुहेरीतील जेतेपदांचा समावेश आहे.

’  महिला दुहेरी : ऑस्ट्रेलियन : २०१६, विम्बल्डन : २०१५, अमेरिकन : २०१५

’  मिश्र दुहेरी : ऑस्ट्रेलियन : २००९, फ्रेंच : २०१२, अमेरिकन : २०१४

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza announces retirement zws
First published on: 20-01-2022 at 03:07 IST