टेनिसपटू सानिया मिर्झाने ‘पेटा’ (एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स) या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेसाठी आपली स्वाक्षरी असलेली रॅकेट देण्याचा निर्णय घेतला आहे. सानियाच्या या रॅकेटचा लिलाव होणार असून, याद्वारे जमा होणारी रक्कम अमानुष कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या सुटकेसाठी वापरण्यात येणार आहे.
ईबे. कॉम या संकेतस्थळावर या रॅकेटचा लिलाव करण्यात येणार असून, याद्वारे जमा होणारी रक्कम ‘अ‍ॅनिमल राहत’ या पेटा इंडिया संस्थेच्या सहयोगी संस्थेला देण्यात येणार आहे.
माझ्या रॅकेटच्या लिलावातून उपलब्ध होणारी रक्कम, जड ओझे वाहून नेणाऱ्या घोडय़ांसाठी, साखर कारखान्यात काम करणारे बैल तसेच वीट भट्टीत ओझी वाहणाऱ्या गाढवांची सुटका करण्यासाठी उपयोगात आणण्यात येणार असल्याचे सानियाने सांगितले.
२००३ साली स्थापन झालेली ‘अ‍ॅनिमल राहत’ ही संस्था घोडे, बैल, गाढव यांच्यासाठी काम करते. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक, पशुप्रेमी यांचा समावेश आहे.