Sanjay Manjrekar On Riyan Parag: राजस्थान रॉयल्स संघासाठी आयपीएल २०२६ स्पर्धा ही रोलर कोस्टर राईडसारखी राहिली आहे. रियान परागच्या नेतृत्वाखाली खेळताना राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. त्यापैकी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल यांनी दमदार कामगिरी केली आहे. पण कर्णधार रियान पराग फलंदाजीत हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. दरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी रियान परागला कर्णधार बनवण्याच्या निर्णयावरून जोरदार टीका केली आहे.

संजय मांजरेकरांच्या मते, रियान पराग गेल्या काही वर्षांपासून हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. त्याची ही कामगिरी पाहता, त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवणं याला काहीच अर्थ नाही. तो फलंदाजीत फ्लॉप ठरला आहे, पण त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पण तरीदेखील त्याला राजस्थान रॉयल्सकडून पाठिंबा का दिला जातोय? असा सवाल संजय मांजरेकर यांनी उपस्थित केला आहे.

पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्स संघांच्या नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत असलेला रियान पराग काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. तो लाईव्ह सामन्यादरम्यान ड्रेसिंग रुममध्ये बसून ई सिगारेट ओढताना दिसून आला होता. त्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर कारवाई करत, त्याच्या मॅच फी वर २५ टक्के दंड आकारला होता.

इन्साइड एज पॉडकास्टवर बोलताना संजय मांजरेकर म्हणाले, “परागचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व नेहमीच वेगळं असल्याचं जाणवतं, परंतु राजस्थान रॉयल्सने इतक्या वर्षांपासून त्याच्यावर एवढा आत्मविश्वास का दाखवला आहे? हे मला समजलेलं नाही.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “जेव्हा पराग धावा करत नसतो तेव्हाही मैदानावर त्याचे वागणे जवळजवळ गर्विष्ठपणासारखे वाटते. त्याने आपल्या कारकिर्दीदरम्यान अनेकदा १४-१५ धावा करताना उत्कृष्ट फटके मारले आहेत. त्याने मारलेले फटके पाहून लोक प्रभावित झाले, पण पुढच्याच चेंडूवर तो तसाच शॉट खेळून बाद झाला आहे.”