Sanjay Manjrekar On Team India: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला ५ सामन्यांच्या मालिकेत ४-० ने पराभवाचा सामना करावा लागली आहे. याआधी आर्यंलडविरुद्ध खेळतानाही भारतीय संघाने २-० ने मालिका गमावली होती. त्यामुळे भारतीय संघावर जोरदार टीका केली जात आहे. पण माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांरजेकर यांच्या मते, आयपीएल संबधित असलेल्या समस्या दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाची निवड ही आयपीएल स्पर्धेतील कामगिरी पाहून केली जाऊ नये, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
भारतीय संघाने काही महिन्यांपूर्वीच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. पण त्यानंतर नेतृत्वाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली. अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघाने आयर्लंडची मालिका २-० ने आणि इंग्लंडविरुद्धची मालिका ४-० ने गमावली आहे.
संजय मांजरेकर यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, “परेदेशात झालेल्या सुमार कामगिरीनंतर भारतीय खेळाडूंवर सहज टीका केली जाऊ शकते. पण तसं व्हायला नको. कारण आयपीएल स्पर्धेत परिस्थिती ही फलंदाजीसाठी अनुकूल असते. त्यामुळे भारतीय फलंदाजांवरील दबाव वाढत जातो.”
तसेच निवडकर्त्यांना सल्ला देत ते म्हणाले, “निवडकर्त्यांनासमोर नक्कीच हे आव्हान असेल की, आयपीएल स्पर्धेत केलेल्या फलंदाजांची कामगिरी न पाहता, अशा फलंदाजांची निवड करावी जे परदेशात चांगली फलंदाजी करु शकतील. त्यांना अशा फलंदाजांना ओळखून भारतीय संघात स्थान द्यावं लागेल. कारण भारतीय संघाला आता जास्तीत जास्त सामने हे परदेशात खेळायचे आहेत.”
भारतीय संघातील खेळाडू आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा झाल्यानंतर आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. या स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी दमदार फॉर्ममध्ये होते. पण परदेशात हे खेळाडू फ्लॉप राहिले. कारण आयपीएल स्पर्धेतील खेळपट्टी पाटा असते, ज्यावर गोलंदाजांना मदत मिळत नाही. तर फलंदाजांची चांदी होते. त्यामुळे चेंडू सरळ बॅटवर येतो. यासह बाऊंड्री देखील छोट्या असतात, त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर नियम, आणखी फायदेशीर ठरतो. पण आंतरराष्ट्रीट क्रिकेटमध्ये असं काहीच नसतं. आयर्लंड आणि इंग्लंडची खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरली. पण भारतीय फलंदाज या खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसून आले.
