Sanjay Manjrekar Murali Kartik Commentary Fight Viral Video: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी समालोचन कक्षात (कॉमेंट्री बॉक्समध्ये) एक काहीसा वेगळाच प्रसंग घडला. भारताचे दोन्ही दिग्गज खेळाडू एकमेकांशी वाद घालताना दिसले. लाईव्ह प्रक्षेपणादरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि मुरली कार्तिक यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. या तणावपूर्ण वादविवादादरम्यान अजिंक्य रहाणे आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालक काही काळ स्पष्टपणे अस्वस्थ झालेले दिसले.

भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर आणि मुरली कार्तिक यांच्यातील या संवादाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुरली कार्तिकच्या वक्तव्याने संजय मांजरेकर काहीसे अस्वस्थ दिसले आणि त्यांनी आपल्या आक्रमक अंदाजात हसत हसत मुरली कार्तिकला प्रत्युत्तर दिलं.

संजय मांजरेकर-मुरली कार्तिक यांच्यात कशावरून जुंपली?

मुरली कार्तिक संजय मांजरेकर यांना म्हणाले, “एक नम्र विनंती आणि तीही सर्वांच्या वतीने एक महत्त्वाची विनंती: तुमचे ‘पाउट’ (ओठ पुढे काढण्याची लकब) या शतकातील सर्वात जबरदस्त आहे, पण त्यामुळे तुम्ही काय बोलताय हे आम्हाला समजत नाही. त्यामुळे, कृपया ते ‘पाउट’ करणं थोडं कमी करा.”

यावर मांजरेकर हसत हसत म्हणाले, “हे खूपच वाईट होतं. आपण ‘स्प्लिट-स्क्रीन’ वापरून कॅमेरा दुसऱ्या व्यक्तीकडे वळवू शकतो का? कारण त्या इतर व्यक्तींशी बोलायला जास्त छान वाटतं आणि त्यांचा चेहराही अधिक प्रसन्न आहे. मला फक्त वाटतंय, ‘सुपर्ब, सुपर्ब, सुपर्ब’… आरशात स्वतःकडे पाहताना मुरली कार्तिक बोलतानाचा आवाज ऐकू येतोय.

यावर क्षणात मुरली कार्तिक म्हणाला, “मी कधीच स्वतःकडे पाहत नाही. ते तू करतोस. फक्त तूच. जर तुला कोणी खरंच ओळखत असेल, तर ते तूच आहेस तुझ्यासोबत खेळलेले लोक, तुझ्यासोबत काम केलेले लोक.”

संजय मांजरेकरांनी यावर प्रत्युत्तर देत म्हणाले, “कारण आरशात पाहण्यासाठी एक प्रोत्साहनही आहे ना, एक कारण आहे. तुझ्यासाठी ते फारसं प्रेरणादायी नाही, हे मी समजू शकतो. असो, आपण दोघेही आता मर्यादा ओलांडणार आहोत आणि सोशल मीडियाला यावर चर्चा करण्यासाठी चांगलंच खाद्य मिळणार आहे.”

भारत-श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. चौथ्या दिवशी भारतीय संघ १९३ धावांवर बाद झाल्यानंतर श्रीलंकेला विजयासाठी ३७२ धावांचं आव्हान दिलं. तर चौथ्या दिवसाअखेर श्रीलंका संघाने ४ विकेट्स गमावत ८४ धावा केल्या आहेत. यासह आता पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी ६ विकेट्सची तर श्रीलंकेला विजयासाठी २८८ धावांची गरज आहे.