IPL 2026 Rishabh Pant Sanjeev Goenka Video: ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील लखनौ सुपर जायंट्स संघाला दिल्ली कॅपिटल्सकडून हंगामाच्या सलामीच्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्सच्या भागीदारीच्या बळावर दिल्लीने ६ विकेट्सने शानदार विजय मिळवला. यासह संघाच्या पराभवानंतर लखनौ संघाचे मालक पुन्हा एकदा मैदानावर उतरले आणि ऋषभ पंत-कोचिंग स्टाफसह चर्चा करतानाचे त्यांचे फोटो, व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. २०२३ मध्ये केएल राहुलला ज्याप्रमाणे त्यांनी भर मैदानात सुनावलं होतं, तसाच काहीसा प्रकार यावेळेस दिसला.

आयपीएल २०२६ च्या सलामीच्या सामन्यानंतर लखनौ सुपर जायंट्सच्या गटात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून लखनौ सुपर जायंट्सला सहा गडी राखून दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर, लखनौ संघाचे मालक संजीव गोएंका, कर्णधार ऋषभ पंत आणि मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्यात मैदानावर झालेल्या जोरदार शाब्दिक चकमकीने लक्ष वेधून घेतलं.

LSGच्या पराभवानंतर मालक संजीव गोयंकांची कॅप्टन-कोचसह गंभीर चर्चा

दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर, लखनौचे इतर खेळाडू दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंशी गप्पा मारताना दिसत होते, तर दुसरीकडे संजीव गोएंका ऋषभ पंत आणि कोच जस्टिन लँगर यांच्याशी गंभीर चर्चा करताना दिसले. संभाषणादरम्यान, ते काहीतरी समजावून सांगत होते, तर पंतही आपले विचार मांडत होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. चाहत्यांनी पुन्हा एकदा लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.

या व्हिडिओमुळे चाहत्यांना केएल राहुल लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार असतानाच्या एका जुन्या घटनेची आठवण झाली. एका सामन्यात पराभव झाल्यानंतर संजीव गोयंका मैदानावर उतरत केएल राहुलला सर्वांसमोर सुनावताना दिले. हा संपूर्ण प्रकार सामन्यादरम्यान कॅमेऱ्यात कैद झाला आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

लखनौ सुपर जायंट्सकडून दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी १४२ धावांचं लक्ष्य देण्यात आलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स सुरुवातीला संघर्ष करताना दिसत होती. मात्र, समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी डाव सावरला आणि नंतर आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी ११९ धावांची भागीदारी केली. यामुळे सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटलं. रिझवीने ४७ चेंडूंमध्ये नाबाद ७० धावा केल्या, तर स्टब्सने ३२ चेंडूंमध्ये महत्त्वपूर्ण ३९ धावा केल्या. दोघांनी मिळून संघाला केवळ १७.१ षटकांत विजय मिळवून दिला.