नवी दिल्ली : कोणत्याही ठोस नियोजनाविना द्विपक्षीय क्रिकेट मालिका आयोजित करण्याचा काळ आता संपला आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजोग गुप्ता यांनी केले. एकदिवसीय क्रिकेटचे स्वरूप अजूनही टिकून राहू शकते, पण ते नव्या पिढीच्या प्रेक्षकांसाठी आकर्षक ठरेल अशा पद्धतीने सादर करण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.

गुप्ता यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली. ट्वेन्टी-२० क्रिकेट लीगचे वाढते वर्चस्व आणि त्याचा कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटच्या भविष्यावर होणारा परिणाम याबाबत त्यांनी आपले विचार मांडले.

‘‘अनियोजित पद्धतीने द्विपक्षीय मालिका आयोजित करण्याचा काळ आता थांबवावा लागेल. संदर्भ, संस्कृती, स्पर्धा आणि चुरस यांचा अभाव असेल, तर कोणताही देश क्रिकेटचा हा भार सोसू शकणार नाहीत. एकदिवसीय क्रिकेटला अजूनही निश्चित स्थान आहे. पुरुष आणि महिला विश्वचषकांशी त्याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे या स्वरूपाची ओळख काय असावी आणि अधिकाधिक देशांना व खेळाडूंना त्यात सहभागी करून घेत त्याचा विस्तार कसा करावा, यावर विचार करावा लागेल,’’ असे गुप्ता यांनी सांगितले.