Sanju Samson Instagram Story: आयपीएल २०२६ स्पर्धेत चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. हा चेन्नईचा या हंगामातील घरच्या मैदानावरील शेवटचा सामना होता. त्यामुळे दोन्ही संघांनी पूर्ण जोर लावला. पण घरच्या मैदानावर खेळताना चेन्नईला विजयाने शेवट करता आला नाही. हा सामना हैदराबादने खिशात घातला आणि प्लेऑफमध्ये प्रवेश केला. यादरम्यान नेहमीच शांत राहणाऱ्या संजू सॅमसन आणि हेनरिक क्लासेन यांच्यादरम्यान जोरदार वाद झाला. हे पाहून अनेकांना धक्का बसला. या वादानंतर आता दोघांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे, जी सध्या तुफान चर्चेत आहे.
संजू सॅमसन आणि हेनरिक क्लासेन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर केली आहे, ज्यात दोघे मिठी मारताना दिसून येत आहेत. दोघांनी मैदानावर जे झालं ते विसरून, मैदानाबाहेरील आपली मैत्री जपली आहे. हा फोटो शेअर करून संजू सॅमसनने आपलया कॅप्शनमध्ये लिहिले की, “मैदानावर अनेक गोष्टी घडतात, पण मैदानाबाहेर या व्यक्तीबद्दल माझ्या मनात आदर आहे प्रेम आहे.” हेनरिक क्लासेननेही ही स्टोरी शेअर करत लिहिले की, “तुझ्याबद्दल माझ्याही मनात प्रेम आणि आदर आहे. तुला खेळताना पाहायला आवडतं. आमच्यात सर्वकाही ठीक आहे. आता मी पुढच्या लढतीची वाट पाहत आहे.”
नेमकं काय घडलं होतं?
हा वाद चेन्नईची गोलंदाजी सुरू असताना १५ व्या षटकात घडला. त्यावेळी हैदराबादचा संघ १८१ धावांचा पाठलाग करत होता. त्यावेळी हेनरिक क्लासेन ४७ धावांवर फलंदाजी करत होता. गोलंदाजी करत असलेल्या नूर अहमदच्या गोलंदाजीवर तो यष्टीचीत होऊन माघारी परतला. बाद होताच तो संताप व्यक्त करू लागला. यादरम्यान तो संजू सॅमसनकडे गेला आणि त्याला काहीतरी बोलू लागला. शेवटी अंपायर्स मध्ये आले आणि वाद वाढायच्या आधीच थांबवला.
क्लासेनने विजयाचा पाया रचला होता. तो ४७ धावांचे योगदान देऊन माघारी परतला. तो बाद होऊनही हैदराबादने हा सामना १९ व्या षटकात ५ गडी राखून जिंकला आणि प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. यादरम्यान इशान किशनने ७० धावांची दमदार खेळी केली. तर कर्णधार पॅट कमिन्सने ३ फलंदाजांना माघारी धाडलं.
