Sanju Samson Breaks Rohit Sharma Record: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना सुरू आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघातील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करून मोठी धावसंख्या उभारली. सलामीला आलेल्या संजू सॅमसनने पुन्हा एकदा चौकार-षटकारांचा पाऊस पाडून दमदार सुरूवात करून दिली. संजू सॅमसनकडे शतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती. पण त्याचं शतक थोडक्यात हुकलं. यादरम्यान त्याने भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अनुकूल ठरते. त्यामुळे या खेळपट्टीवर मोठ्या धावांचा डोंगर उभारला जातो आणि धावांचा यशस्वी पाठलाग देखील केला जातो. त्यामुळे इंग्लंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीच करायची होती, असं सूर्यकुमार यादव म्हणाला. हा निर्णय भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला. भारतीय फलंदाजांनी २० षटकांअखेर ७ गडी बाद २५३ धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान संजू सॅमसनने ८९ धावांची खेळी केली.

संजू सॅमसनने मोडला रोहित शर्माचा रेकॉर्ड

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड हा भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर होता. रोहित शर्माने याआधी एकाच टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत १५ षटकार खेचले होते . आता संजू सॅमसनने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. संजू सॅमसनला या स्पर्धेतील ४ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या ४ सामन्यांमध्ये त्याने सर्वाधिक षटकार खेचण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. संजू सॅमसनने आतापर्यंत १६ षटकार खेचले आहेत.

भारतीय संघाने उभारला धावांचा डोंगर

या सामन्यात नाणेफेक गमावून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. सलामीला आलेला अभिषेक शर्मा या सामन्यातही हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. अभिषेक स्वस्तात माघारी परतल्यानंतर संजू सॅमसनने संघाचा डाव सांभाळला. त्याने २६ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर ४२ चेंडूत ८९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यानत त्याने ८ चौकार आणि ७ षटकार खेचले. तर इशान किशनने ३९ धावांची खेळी केली. धावबाद झालेल्या शिवम दुबेने ४३ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ११ धावा केल्या. शेवटी तिलक वर्माने ७ चेंडूत २१ धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने नाबाद २७ धावा केल्या. यासह भारतीय संघाने २० षटकांच्या समाप्तीनंतर ७ गडी बाद २५३ धावांचा डोंगर उभारला.