Sanju Samson Broke MS Dhoni Record: चेपॉकच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात इतिहास रचला गेला. अनेक वर्षांपासून महेंद्रसिंग धोनीच्या नावावर असलेला विक्रम आता संजू सॅमसनने मोडला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनने अवघ्या १३ चेंडूंमध्ये २७ धावा ठोकल्या. आपल्या या छोट्याशा खेळीत त्याने पाच चौकार आणि एका षटकारासह धोनीचा मोठा विक्रम मोडित काढला आहे.
चेन्नई सुपर किंग्सने हैदराबादविरूद्ध सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यासह चेन्नईने ७ विकेट्स गमावत १८० धावा केल्या. चेन्नईच्या सर्व फलंदाजांनी ही धावसंख्या गाठण्यात कमी अधिक प्रमाणात हातभार लावला. तर डेवाल्ड ब्रेविसने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली.
संजू सॅमसनने धोनीचा विक्रम मोडत, चेन्नई सुपर किंग्ससाठी यष्टीरक्षक म्हणून एकाच हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला आहे. धोनीने २०१३ च्या हंगामात चेन्नईसाठी यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून १६ डावांमध्ये ४६१ धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडण्यासाठी संजू सॅमसनला केवळ १२ धावांची गरज होती आणि त्याने अत्यंत आक्रमक सुरूवात करत ही कामगिरी केली. सॅमसनने नितीश कुमार रेड्डीच्या पहिल्याच षटकात १५ धावा करून धोनीचा विक्रम मोडला.
एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या यष्टीरक्षक-फलंदाजांच्या या विशेष यादीतील पहिल्या १० खेळाडूंमध्ये धोनी आणि सॅमसनच्या व्यतिरिक्त इतर कोणाचाही समावेश नाही. खरं तर, सीएसकेसाठी एकाच हंगामात १०० पेक्षा जास्त धावा करणारे केवळ तीन यष्टीरक्षक आहेत. यामध्ये धोनी, पार्थिव पटेल आणि आता संजू सॅमसन यांचा समावेश आहे.
एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारे चेन्नई सुपर किंग्सचे यष्टीरक्षक-फलंदाज:
संजू सॅमसन – ४७७ धावा (२०२६)
एम.एस. धोनी – ४६१ धावा (२०१३)
सॅमसन सुरुवातीपासूनच चांगल्या लयीत दिसत होता. त्याने प्रफुल्ल हिंगेच्या षटकात सलग तीन चौकार मारले आणि अवघ्या ११ चेंडूंमध्ये २७ धावा करून वादळी फटकेबाजी करत होता. मात्र, त्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स गोलंदाजीसाठी आला आणि त्याने कमालीच्या चेंडूवर सॅमसनला बाद करत संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली.
त्याने आधी यॉर्कर टाकून दबाव निर्माण केला आणि नंतर ऑफ-स्टंपच्या बाहेर चेंडू टाकून त्याला चूक करण्यास भाग पाडलं आणि बॅटची कड घेत चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेला. संजू सॅमसन या मोसमात ५०० धावा करण्याच्या अगदी जवळ आहे. तो पुढच्या सामन्यात हा टप्पा गाठू शकतो. त्याने या मोसमात १३ सामन्यांमध्ये आधीच ४७७ धावा केल्या आहेत.
