Anil Kumble On Sanju Samson Leadership: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत संजू सॅमसनचा बोलबाला पाहायला मिळाला. आधी संजूला संघात स्थान मिळणंही कठीण होतं. पण त्याने संघात स्थान मिळवलं आणि भारताला चॅम्पियन बनवलं. आता तो आयपीएल २०२६ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाला चॅम्पियन बनवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. संजू सॅमसन सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. टी -२० वर्ल्डकपमधील शेवटच्या तिन्ही सामन्यांमध्ये त्याने लागोपाठ ३ अर्धशतकं झळकावली. दरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी संजू सॅमसनबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
काय म्हणाले अनिल कुंबळे?
संजू सॅमसनबद्दल बोलताना अनिल कुंबळे म्हणाले, “तो उपकर्णधाराची भूमिका पार पाडू शकतो. त्याने बरेच वर्ष राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळे ही भुमिका त्याच्यासाठी योग्य आहे. त्याला ही जबाबदारी सहज जमते. सीएसकेला ते हवं आहे. गेल्यावेळी जेव्हा ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाला होता, त्यावेळी एमएस धोनीला संघाचं नेतृत्व करावं लागलं होतं. त्याआधी रवींद्र जडेजा संघाचा कर्णधार होता. त्यावेळीही मध्येच एमएस धोनीला पुन्हा एकदा संघाचं नेतृत्व करावं लागलं होतं.”
संजू सॅमसन नेतृत्व करण्यासह यष्टिरक्षक फलंदाजाची भूमिकाही पार पाडू शकतो. याबाबत बोलताना अनिल कुंबळे म्हणाले, “जर स्पर्धा सुरू असताना एमएस धोनीने संजू सॅमसनला यष्टिरक्षण करायला सांगितलं, तर आश्चर्य वाटायला नको. तो नेतृत्व गटाचा भाग असेल. जर काही कारणास्तव ऋतुराज गायकवाड संघाबाहेर असेल. तर धोनीऐवजी संजू सॅमसन निर्णय घेऊ शकतो.”
संजू सॅमसनकडे संघाचं नेतृत्व करण्याचा चांगलाच अनुभव आहे. त्याने बरेच वर्ष राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व केलं आहे. यासह त्याने आपल्या संघाला प्लेऑफपर्यंत पोहोचवलं आहे. गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना त्याने ९ सामन्यांमध्ये ३५.६२ च्या सरासरीने १६ सामन्यामध्ये ५३१ धावा केल्या होत्या.
