Sanju Samson Creates History: संजू सॅमसनच्या ८७ धावांच्या खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्स संघाता ८ विकेट्सने सहज पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार विजय मिळवून देत संजू सॅमसनने ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयामुळे चेन्नईच्या प्लेऑफच्या आशा अधिक मजबूत झाल्या. संजूच्या या मोठ्या विक्रमासह तो अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

३१ वर्षीय संजू सॅमसनने ५२ चेंडूत नाबाद ८७ धावांची दमदार खेळी केली. संजूने या डावात १६७.३१च्या स्ट्राईक रेटने ७ चौकार आणि ६ षटकारांसह ही खेळी केली. या उत्कृष्ट खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे, दिल्लीविरुद्ध हा पुरस्कार मिळवण्याची ही त्याची दुसरी वेळ ठरली. यापूर्वी ११ एप्रिलला चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यातही त्याने नाबाद ५६ चेंडूत ११५ धावा करत चेन्नईला ८ विकेट्सनी विजय मिळवून दिला होता.

संजू सॅमसनने इतिहास घडवला

संजू सॅमसन हा आयपीएलच्या एका हंगामात एका संघाविरुद्ध २०० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम केएल राहुलच्या नावावर होता. दिल्ली संघाविरुद्धचा हा विक्रम पूर्वी ॲडम गिलक्रिस्टच्या नावे होता.

एका सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाविरूद्ध २०० अधिक धावा करणारे फलंदाज

संजू सॅमसन – २०२६ – २ सामने
इशान किशन – २०१० – ४ सामने
मयंक अग्रवाल – २०२१ – २ सामने
विराट कोहली – २०१३ – २ सामने
एबी डिव्हिलियर्स – २०१८ – २ सामने

सॅमसन हा आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात एका संघाविरुद्ध २००+ धावा करणारा सातवा खेळाडू ठरला आहे, तर लीग टप्प्यातच ही कामगिरी करणारा तो पाचवा खेळाडू आहे. एका हंगामात एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने २०१६ मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध २२८ धावा केल्या होत्या.

एकाच संघाविरूद्ध सर्वाधिक धावा करणारे यष्टीरक्षक फलंदाज

संजू सॅमसन – २०२ धावा वि. दिल्ली कॅपिटल्स – २०२६
केएल राहुल – १९३ धावा वि. आरसीबी – २०१९
नमन ओझा – १७४ धावा वि. सीएसके – २०१०
केएल राहुल – १७१ धावा वि. मुंबई इंडियन्स – २०२०
क्विंटन डीकॉक – १६८ धावा वि. आरसीबी – २०१६