हैदराबाद : वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० मालिकेतील चारपैकी तीन सामन्यांत दोनशेहून अधिक धावा खर्ची करणार्या भारतीय गोलंदाजांची संजू सॅमसनने पाठराखण केली आहे. युवा गोलंदाजांबाबत संयम गरजेचा असून त्यांना अधिकाधिक सामने खेळण्याची संधी आणि संघाचा पाठिंबा मिळाल्यास त्यांच्या कामगिरीत निश्चित सुधारणा होईल, असा विश्वास सॅमसनने व्यक्त केला.
हैदराबाद येथे बुधवारी झालेल्या चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताला २४ धावांनी पराभव पत्करावा लागला. विंडीजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २४७ धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारताचा संघ १९.३ षटकांत २२३ धावांत गारद झाला. या विजयामुळे विंडीजने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली असून आता शनिवारी बंगळूरु येथे होणारा अखेरचा सामना निर्णायक ठरणार आहे.
या मालिकेसाठी तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत अनुभवी अर्शदीप सिंग, तसेच मयांक यादव आणि प्रिन्स यादव या युवा गोलंदाजांना सपाट खेळपट्ट्यांवर विंडीजच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश येत आहे. मात्र, हे गोलंदाज गुणवान असून त्यांच्या क्षमतेवर विश्वास राखणे आवश्यक असल्याचे सॅमसनला वाटते.
‘‘बुमरा हा एका पिढीत एकदाच घडणारा गोलंदाज आहे आणि तो भारतीय संघाचा भाग असणे हे आमचे भाग्य आहे. मात्र, आपल्याकडे उदयोन्मुख प्रतिभावान गोलंदाजही आहेत. अर्शदीप सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. प्रिन्स यादवने गेल्या काही सामन्यांत ज्या प्रकारे गोलंदाजी केली, ती प्रभावी आहे,’’ असे सॅमसन चौथ्या सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला.
युवा गोलंदाजांना सातत्याने संधी देण्याची गरजही सॅमसनने अधोरेखित केली. ‘‘या खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना अधिक सामने खेळण्याची संधी दिली आणि त्यांच्यावर विश्वास दाखवला, तर अनुभवातून त्यांच्या कामगिरीत नक्कीच सुधारणा होईल,’’ असे त्याने सांगितले.
चौथ्या सामन्यात मयांक आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी चार षटकांत ५२ धावा दिल्या. त्यातच फलंदाजीदरम्यान अखेरच्या षटकात अर्शदीपला शमार जोसेफचा उसळता चेंडू डाव्या खांद्याला लागला. त्यानंतर वैद्यकीय मदत घेत तो मैदानाबाहेर गेला. ‘‘अर्शदीप खांद्याला बर्फ लावून बसला होता. त्याची ही दुखापत गंभीर नसेल अशीच आशा आहे,’’ असे सॅमसनने नमूद केले.
