Sanju Samson Emotional Post for Wife: संजू सॅमसनसाठी टी-२० विश्वचषक २०२६ स्वप्नवत ठरला. टी-२० विश्वचषकापूर्वीची भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिका संजूसाठी खूप वाईट ठरली. या मालिकेत संजूच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत. दरम्यान २०२४ टी-२० विश्वचषकाप्रमाणे यंदाच्या विश्वचषकातही त्याला खेळण्याची संधी मिळणार नाही, हे त्याला कळून चुकलं. पण संघाच्या एका पराभवानंतर सारं चित्र बदललं आणि सलग तीन सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी करत संजू स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला. संजू सॅमसनने या ऐतिहासिक क्षणानंतर त्याच्या पत्नीसाठी खास पोस्ट केली आहे.
टी-२० विश्वचषकातील गट टप्प्यात संजूला एक सामना खेळण्याची संधी मिळाली. त्या सामन्यात त्याने आक्रमक सुरूवात केली, पण लवकर बाद झाला. यानंतर पुन्हा आता विश्वचषक खेळण्याची संधी मिळणार नाही असं त्याला वाटलं. पण सुपर-८ मधील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पराभवानंतर टीम इंडियामध्ये बदल करण्यात आले. संजू सॅमसन व अभिषेक शर्माच्या जोडीला सलामीला पाठवलं, तर इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आणि यानंतर भारताने एकही सामना गमावला नाही.
संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरूद्ध नाबाद ८९ धावांची खेळी केली, यानंतर इंग्लंडविरूद्ध ९७ धावांवर बाद झाला आणि फायनलमध्ये तो ४६ चेंडूत ८९ धावा करत बाद झाला. त्याच्या या अद्वितीय कामगिरीमुळे त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारानंतरही तो भावुक झाला होता. संजूने सातत्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह संपर्क साधला आणि त्यात सचिनचं त्याला मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि संघाच्या विश्वचषक विजयात मोठी भूमिका बजावली.
संजू सॅमसनने टी-२० वर्ल्डकप विजयानंतर पत्नीचे मानले आभार
मैदानावर आणि मैदानाबाहेर फॉर्मशी झुंजत असताना खेळाडूंना सर्वाधिक आधार आणि पाठिंबा असतो तो जोडीदाराचा. संजूने टी-२० वर्ल्डकप विजयानंतर पत्नी चारूलताबरोबरचा फोटो शेअर करत तिचे विशेष आभार मानले. संजूने या पोस्टमध्ये लिहिलं, “मी तुला पहिल्यांदा भेटलो त्या दिवसापासून आजपर्यंत… माझ्या आयुष्यात सतत माझ्या सोबत राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.”
संजू पुढे पोस्टमध्ये म्हणाला, “मी जसा आहे तसाच मला स्वीकारल्याबद्दल, बाहेरच्या जगासाठी मी काहीही असलो तरी माझ्याशी नेहमी प्रामाणिक आणि खरं राहिल्याबद्दल तुझे खूप आभार. माझ्या आयुष्यातील चांगल्या-वाईट सगळ्या बाजू तू पाहिल्यास, तरीही प्रत्येक वेळी ठामपणे माझ्या पाठीशी उभी राहिलीस. क्रिकेटला माझ्या आयुष्यात किती मोठं स्थान आहे हे समजून घेतलंस आणि तूही क्रिकेटला तितकंच महत्त्व दिलंस, यासाठीही धन्यवाद.”
अखेरीस संजू म्हणाला, “या क्षणासाठी मी ज्या उत्कटतेने आणि जिद्दीने स्वप्न पाहिलं, त्याच तीव्रतेने तूही माझ्यासोबत ते स्वप्न पाहिलंस आणि ते मनापासून जगलंस. खूप खूप धन्यवाद माझी डियर बायको.”

संजू सॅमसनच्या या पोस्टवर कर्णधार सूर्यकुमार यादवने खास कमेंट केली आहे. सूर्याने या पोस्टवर चेतान आणि चेची अशी कमेंट केली आहे, मराठीत याचा अर्थ मोठा भाऊ आणि मोठी वहिनी असा आहे.
