Sanju Samson Welcome In Thiruvananthapuram: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी – २० सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. मालिकेतील सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारून ३-० ने विजयी आघाडी घेतली. त्यानंतर मालिकेतील चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने दमदार पुनरागमन केलं आणि ५० धावांनी दमदार विजय मिळवला. मालिकेतील शेवटचा सामना जिंकून न्यूझीलंडचा संघ शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर भारतीय संघ ४-१ ने मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. हा सामना शनिवारी तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू तिरुवनंतपुरममध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान संजू सॅमसनच्या एन्ट्रीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तिरुवनंतपुरम हे भारताचा स्टार फलंदाज संजू सॅमसनचं होम ग्राउंड आहे. त्यामुळे विमानतळावर संजू सॅमसनला पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी तुफान गर्दी केली. संजू सॅमसन विमानतळाच्या बाहेर येताच चाहत्यांना असं काहीतरी पाहायला मिळालं, जे पाहून सर्वांना हसू अनावर झालं. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने संजू सॅमसन VIP ट्रीटमेंट दिली. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाचव्या टी – २० सामन्याआधी भारतीय संघातील खेळाडू तिरुवनंतपुरममध्ये दाखल झाले आहेत. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, विमानतळावरून बाहेर येईपर्यंत सूर्या संजू सॅमसनच्या बॉडीगार्डची भूमिका पार पाडतो. या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकू शकता की, सूर्या म्हणतो, “कृपा करून वाट मोकळी करा, चेट्टाला (मोठ्या भावाला) कोणीही त्रास देऊ नका. कोणीही फोटो क्लिक करू नका. कृपा करून जाण्यासाठी वाट मोकळी करा.” सूर्यकुमार यादवचं हे बोलणं ऐकून संजू सॅमसनलाही हसू आवरलं नाही.

पुढे सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनला प्रश्न विचारला आणि संजूने त्याचं उत्तरही दिलं. सूर्याने विचारलं, “लॉर्ड्स ओवन कंट्रीत येऊन कसं वाटत आहे?” यावर उत्तर देताना संजू म्हणाला, “इथे येऊन नेहमीच चांगलं वाटतं. यावेळीही इथे येणं खूप स्पेशल आहे.” या व्हिडीओवर क्रिकेट चाहते मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.