Suryakumar Yadav Praised Sanju Samson Video: संजू सॅमसनच्या ९७ धावांच्या खेळीच्या बळावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजला पराभवाचं पाणी पाजत सेमीफायनलमध्ये धडक मारली. सलामीला उतरलेला संजू सॅमसन संघाला विजय मिळवून देत नाबाद माघारी परतला. संजूने या खेळीदरम्यान संयमाने खेळत आणि प्रसंगी आक्रमक फटके खेळत संघाला विजयापर्यंत नेलं. त्याच्या या खेळीनंतर कर्णधार सूर्याने त्याच्यासमोर झुकत त्याचं कौतुक केलं. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये देखील सूर्याने संजूचं खास कौतुक केलं आहे.
सूर्यकुमार यादवने बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हीडिओमध्ये संजू सॅमसनचं इतकं कौतुक केलं की अखेर संजूला कर्णधाराला थांबण्याची विनंती करावी लागली, नाहीतर मी रडायलाच लागेन, अशी प्रतिक्रियाही सॅमसनने दिली. या सामन्यात सॅमसनने ५० चेंडूत ९७ धावांची शानदार खेळी करत टी-२० विश्वचषकात यशस्वी धावांचा पाठलाग करताना भारतासाठी सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर केला. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता.
सूर्या संजू सॅमसनबद्दल नेमकं काय म्हणाला?
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनचं खूप कौतुक केलं. तसेच, कॅम्पदरम्यान संजू सॅमसनने संघाला काय संदेश दिला होता, हेही त्याने उघड केलं.
“मी नेहमी म्हणतो, चांगल्या माणसांसोबत चांगल्या गोष्टी योग्य वेळी घडतात. त्याच्यासारख्या खेळाडूसाठी यापेक्षा चांगला क्षण किंवा मोठं व्यासपीठ असू शकत नाही. संघाला ज्या गोष्टीची गरज होती, त्यासाठी तो पुढे आला. संघात परत आल्यानंतर आम्ही सगळे बसलो तेव्हा त्याने पहिल्यांदा एवढंच सांगितलं होतं, ‘आपल्याला जे हवं आहे ते नाही, तर संघाला जे हवं आहे ते करूया,’” असं सूर्यकुमारने त्याच्याबद्दल म्हटलं.
“आयुष्यात आपण अनेक चढ-उतार पाहतो. त्याची जागा गेली, वेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली आणि पुन्हा त्याच जागेवर परत आला, हे सगळं सोपं नव्हतं. पण विश्वचषक जिंकणं कधीच सोपं नसतं. आयसीसी स्पर्धांमध्ये सामने धाडसी खेळाडू जिंकून देतात आणि ही तशीच धाडसी खेळी होती. चांगली सुरुवात मिळाल्यावर तो सहज आक्रमक फटकेबाजी शकला असता, पण त्याने एक बाजू सांभाळली, संघाला शेवटपर्यंत नेलं. त्याला सर्व श्रेय मिळायलाच हवं.
सूर्या पुढे म्हणाला, मी त्याच्यासाठी, त्याची पत्नी आणि कुटुंबासाठी, तसेच त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांसाठी खूप आनंदी आहे. आपण आता लक्ष्याच्या आणखी एक पाऊल जवळ आलो आहोत. आशा आहे, ही कामगिरी अशीच सुरू राहील. मला अजून बरंच काही सांगायचं आहे, पण मी खूप आनंदी आहे. तो यासाठी पूर्णपणे पात्र आहे,” असे सूर्यकुमार म्हणाला.
सूर्या बोलत असताना संजूने त्याला घट्ट मिठीदेखील मारली. संजू सूर्याकडे भावुक होत या व्हीडिओदरम्यान पाहतानाही दिसला. अखेरीस संजू त्याला म्हणाला, बस्स कर अब रूलायेगा क्या पगले… आणि दोघंही हसू लागले आणि संजू त्याचे आभार मानत होता. हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
