इंडियन प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील दुसरा क्वॉलिफायर सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. राजस्थान रॉयल्सने सात गडी राखून या सामन्यात विजय मिळवला. सलामीवीर जोस बटलरच्या शतकी खेळीच्या बळावर राजस्थानने विजय मिळवत आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. संजू सॅमसन पुन्हा एकदा आरसीबी संघातील वानिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला.

आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान आणि बंगळुरू यांच्यात तीन सामने खेळवण्यात आले. यातील दोन सामने राजस्थानने जिंकले तर एक सामना आरसीबीने जिंकला. या तिन्ही पण दोन्ही सामन्यांमध्ये एक समानता होती, ती म्हणजे राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनचा बळी. साखळी टप्प्यातील दोन्ही सामन्यांमध्ये मूळचा श्रीलंकन डावखुरा फिरकीपटू वानिंदू हसरंगाने त्याला बाद केलं होते. पहिल्या सामन्यात सॅमसन झेलबाद झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात त्रिफळाचित झाला होता. हीच परंपरा क्वॉलिफायर सामन्यातही सुरू राहिली. आज झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा हसरंगाने संजूला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यामुळे आयपीएलच्या या हंगामात तो तिसऱ्यांदा हसरंगाचा बळी ठरली.

केवळ आयपीएल २०२२ मध्येच नाही तर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये संजू सॅमसनचे वानिंदू हसरंगाविरुद्धचे रेकॉर्ड खूपच खराब आहे. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत हे दोन्ही खेळाडू सातवेळा आमनेसामने आले आहेत. ज्यापैकी हसरंगाने सॅमसनला सहावेळा बाद केले आहे.